मच्छिंद्र ऐनापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबिळूर : जत तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक विस्तारक्षेत्र असलेल्या जत तालुक्याच्या विभाजनाची मागणी चाळीस वर्षांहून अधिक काळची आहे. यापूर्वी दिलेले प्रस्ताव मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळाले होते. त्यामुळे अलीकडे पुन्हा नव्याने प्रस्ताव देण्यात आलेत. उमदी आणि संख या दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आले आहेत.राज्य शासनाने राज्यातल्या तालुका आणि जिल्हा विभाजनाबाबत दोन समित्या नेमल्या होत्या. त्यानुसार या दोन्ही समित्यांनी अहवाल नुकताच शासनाला सादर केला आहे. लवकरच विभाजनाच्या हालचाली सुरू होणार आहेत.अमरावतीचे तत्कालीन विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा अभ्यास करून अहवाल सादर केला; तर तालुक्यांच्यासंदर्भात अनुपकुमार यांची समिती नेमण्यात आली होती. त्यांनीही आपला अहवाल सादर केला आहे. अगोदरच राज्यात पाच हजार सज्जे निर्माण करण्यात आले आहेत. शिवाय सांगली जिल्ह्यातल्या वाळवा, आष्टा आणि संखसाठी उपविभाग झाले आहेत.यावर राज्याचे प्रधान सचिव आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अधिकारी अभ्यास करून लवकर नवे तालुके आणि जिल्हे जाहीर करणार आहेत, असे खुद्द महसूलमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यातल्या अन्य नव्या तालुक्यांची निर्मिती होण्याबाबत आशा निर्माण झाली आहे.आमदार विलासराव जगताप यांनी उमदीलाही अप्पर कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. यात तडजोड होऊन तालुक्याचे विभाजन होऊन लवकरच नव्या तालुक्याची निर्मिती होईल, असे बोलले जात आहे.महसूलमंत्र्यांची जवळीक : फायद्याचीमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची आणि तालुक्यातील भाजपच्या नेत्यांची जवळीक आहे. त्यामुळे जत तालुक्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी संखला अप्पर कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे संख तालुक्याची निर्मिती होण्याची आशा निर्माण झाली आहे.
जतच्या विभाजनाच्या आशा पुन्हा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:06 AM