सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आशा व गटप्रवर्तक महिलांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. रुग्णांच्या घरी जाऊन पाहणी करणे, औषधोपचार करणे व अधिकाऱ्यांना अहवाल देण्याची जबाबदारी फक्त आशा व गट प्रवर्तक महिलांवर आहे. परंतु, त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. हजार रुपये मानधनाची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी त्वरित करा, अशी मागणी आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी केली आहे.
ते म्हणाले की, राज्य सरकार आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून आशा, गटप्रवर्तकांना योग्य मोबदला दिला जात नाही. मागील वर्षापासून कोरोना रुग्णांसाठी या महिला रात्रंदिवस काम करीत आहेत. त्या कोरोनाबाधित झाल्या आहेत. तरीही अधिकारी रजा देत नाहीत. कोरोनाने मृत्यू झालेल्या आशांना घोषित ५० लाखांचा विमा अजूनही मिळालेला नाही. दरमहा ५०० रुपये मानधन मिळते. मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांनी दरमहा हजार रुपये देण्याची घोषणा केली; पण प्रत्यक्षात एकाच महिन्याचे हजार रुपये ग्रामपंचायतीकडून मिळाले. मानधनाचा प्रश्न आठ दिवसांत सोडविला नाही तर बेमुदत आंदोलन करण्यात येईल.