जत : तालुक्यातील निगडी खुर्द येथील विजय लक्ष्मण जाधव व राजकुमार लक्ष्मण जाधव यांच्या शेतजमिनीतील फळबागेला विद्युतवाहिनीतून ठिणग्या पडून आग लागली. यामध्ये दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २० डिसेंबररोजी दुपारी एकच्यादरम्यान घडली. याप्रकरणी जाधव बंधूूंनी गुरुवारी (दि. २९) जत पोलिसांत तक्रार दाखल केली.निगडी खुर्द गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतजमिनीत आंबा, चिकू व द्राक्षबाग असून, सभोवताली पेरू, अंजीर, नारळ आदी फळझाडे लावली आहेत. फळबाग आणि झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या फळबागेवरून पवनऊर्जा कंपनीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या तारा गेल्या आहेत. २० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्यादरम्यान वीज वाहक तारांमधून ठिणग्या बागेत पडल्याने संपूर्ण आंब्याची, चिकूची बाग व सभोवताली असलेली पेरू, अंजीर, नारळाची झाडे आणि द्राक्षबागेतील दोनशे झाडे जळून भस्मसात झाली. आग लागल्यानंतर ठिबक सिंचनची पाईप वितळून गेली आहे. याप्रकरणी गावकामगार तलाठी निखिल पाटील, कोतवाल विनोद कोळी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा प्रस्ताव त्यांनी शासनाला सादर केला आहे.शासनाने पंचनामा करून आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे दाखविले आहे. मागील आठ-दहा वर्षांपासून फळबागेची जोपासना केली आहे. ठिबक सिंचनची संपूर्ण यंत्रणा भस्मसात झाली आहे. आता नव्याने फळबागेची उभारणी करावी लागणार आहे. त्यामुळे सुमारे पंचवीस लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जाधव बंधूूंनी केली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनीही महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
फळबाग आगीत खाक
By admin | Published: December 29, 2016 11:11 PM