सांगली : लोकशाही बळकट करण्यासाठी व आपला मतदानाचा हक्क चुकू नये, याची आस लागून राहिलेल्या काही आजारी रुग्णांनी मंगळवारी रुग्णालयातून डिसचार्ज मिळताच प्रथम थेट मतदान केंद्र गाठून मतदान केले आणि मगच ते घरी गेले. काही रुग्णांनी तर मतदान करण्यासाठी डिसचार्ज देण्याचा आग्रह धरला. अनेकांनी तर मतदानापुरते सोडा, अशी डॉक्टरांकडे विनंती केली.सांगलीत माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर येथील प्रताप आप्पासाहेब मोकाशी (वय ६६) हे चार दिवसांपासून सांगलीत खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना दमा व श्वास घेण्याचा त्रास होता. दुपारी अडीच वाजता त्यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळाला. घरच्यांना त्यांनी, प्रथम मतदान करण्याचा हक्क बजावू आणि मग घरी जाऊ, असे सांगितले. त्यानुसार घरच्यांसमवेत दुपारी सव्वातीन वाजता त्यांनी आरटीओ कार्यालयाजवळील महापालिका शाळेतील केंद्रावर जाऊन मतदान केले.या भागातील तुकाराम गुजरे (६२) हेही गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मिरजेतील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. आजपर्यंत त्यांनी कधीच मतदान चुकविले नाही. मंगळवारीही ते थेट रुग्णालयातून सांगलीत आले. आरटीओ कार्यालयाजवळील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केले.गार्डी (ता. खानापूर) येथील कुसुम सुबराव बाबर (वय ८५) या काही दिवसांपासून आजारी आहेत. दोन महिन्यांपासून त्या आॅक्सिजनवर आहेत. मंगळवारी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात लावण्यात आलेल्या आॅक्सिजनसह गार्डीतील मतदान केंद्रावर मतदान करण्यास आणले होते. यावेळी मोठी गर्दी होती. परंतु रांगेतील मतदारांनी कुसुम बाबर यांची परिस्थिती पाहून प्रथम त्यांना मतदान करण्यास दिले. स्वातंत्र्यसैनिक सुबराव बाबर यांच्या त्या पत्नी आहेत.
रुग्णालयातून थेट मतदान केंद्रावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:37 PM