लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्यायला पाणी न दिल्याच्या कारणावरून कवलापूर (ता. मिरज) येथील गोपीनाथ टी हाऊस या हॉटेलवर पाच ते सहाजणांनी तलवार व गुप्तीने हल्ला केला. हॉटेल मालक गोपीनाथ यांना बेदम मारहाण केली. शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रविवारी गाव बंद ठेवले होते.गोपीनाथ हे मूळचे केरळचे आहेत. गेल्या ३० वर्षांपासून त्यांचे कवलापुरात सोसायटी चौकात हॉटेल आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता ते हॉटेल बंद करीत होते. त्यावेळी गावातील एक तरुण आला व त्याने पाणी पिण्यास मागितले. गोपीनाथ यांनी, हॉटेल बंद झाले आहे, असे सांगितले. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. दोघेही एकमेकांच्या अंगावर गेले. हॉटेलमधील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद मिटविला. त्यानंतर हा तरुण गावात गेला. त्याने पाच ते सहा मित्रांना घेऊन पुन्हा गोपीनाथ यांचे हॉटेल गाठले. त्यावेळी त्यांच्या हातात तलवार, काठ्या व गुप्ती होती. हॉटेलमधील साहित्यावर हल्ला करून त्याची मोडतोड केली. गोपीनाथ व काही कामगारांनाही मारहाणही केली.रविवारी सकाळी या घटनेचे वृत्त वाºयासारखे पसरताच ग्रामस्थांनी हॉटेलजवळ मोठी गर्दी केली होती. या घटनेचा निषेध करून गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातून फेरी काढून बंदचे आवाहन केले. दिवसभर गाव बंद होते. दरम्यान, एवढी गंभीर घटना घडूनही सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याची दुपारपर्यंत कोणतीही नोंद झाली नाही. गाव बंद असूनही पोलीस गावाकडे फिरकले नव्हते.
कवलापुरात हॉटेलवर हल्ला; मालकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:00 AM