इस्लामपूर : दारू प्यायला आल्यावर बिल मागायचे नाही आणि प्रत्येक महिन्याला खर्चासाठी १० हजार रुपये द्यायचे, अशी खंडणीची मागणी करत एकाने हॉटेलच्या व्यवस्थापकाला मारहाण करून त्याच्या नाकाचे हाड मोडत गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी रात्री घडला.
याबाबत हॉटेल व्यवस्थापक किशोर शंकर विचारे (५६, रा.महादेवनगर, इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंद्रजित दिनकर मस्कर (रा. पवार गल्ली, इस्लामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, येथील न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंद्रजित मस्कर हा त्याचा मित्र तानाजी ज्ञानदेव बाबर याच्यासोबत हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आला. काउंटरवरील बिलिंग ऑपरेटर चंद्रकांत चव्हाण यांनी मस्कर यास दारूचे व इतर खाद्याचे १ हजार २० रुपयांचे बिल झाल्याचे सांगून त्याची मागणी केली. त्यावर इंद्रजित मस्कर याने चव्हाण याला रागाच्या रागातत ‘मी कोण आहे, तुला माहीत आहे का, तू मला दारूचे पैसे मागायचे नाहीत’, असे धमकावत होता. यावेळी किशोर विचारे समजावून सांगण्यासाठी मध्ये आले असता इंद्रजित मस्कर याने त्यांच्या तोंडावर ठोसा मारला. यामध्ये त्यांच्या नाकाचे हाड मोडून ते रक्तबंबाळ झाले. हॉटेलमधील इतरांनी भांडण सोडविले. त्यावेळी मस्कर याने, ‘ ज्या ज्या वेळेस दारू प्यायला येईल, त्यावेळी बिल मागायचे नाही आणि प्रत्येक महिन्याला खर्चासाठी १० हजार रुपये द्यायचे’, अशी खंडणीची मागणी करत त्याने पोबारा केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सहायक पोलीस फौजदार बळीराम घुले अधिक तपास करीत आहेत.