सांगली : कर्नाळ रोडवरील हॉटेल रणवीरमध्ये हायप्रोफाइल वेश्या अड्डा सुरू केल्याप्रकरणी या हॉटेलच्या मालकांना अटक करण्यात आली. राघवेंद्र कोरागा शेट्टी (वय ३६), त्याचा भाऊ रवींद्र उर्फ रवीअण्णा कोरागा शेट्टी (वय ३०, दोघेही रा. सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
कर्नाळ रोडवर असलेल्या हॉटेल रणवीरवर छापा टाकून पोलिसांनी सुरू असलेला हायप्रोफाइल वेश्या अड्डा उद्ध्वस्त केला होता. या वेळी हॉटेल व्यवस्थापक राजेश बाबू यादव, एजंट शिवाजी नारायण गोंधळे उर्फ वाघळे (रा. तासगाव) यांच्यासह ग्राहक म्हणून आलेला आटपाडी पोलीस ठाण्याचा निरीक्षक अरुण रामचंद्र देवकर (रा. आटपाडी), सत्यजीत दिगंबर पंडित (रा. मिरज) यांच्यावरही कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली होती.
हॉटेल रणवीरमध्ये शेट्टी बंधूंनी हायप्रोफाइल वेश्या अड्डा सुरू करण्यासाठी दोन महिलांना आणले होते. याबाबतची कुणकुण लागताच पंधरवड्यापूर्वी सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकासह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. या कारवाईत पोलीस निरीक्षकच ग्राहक म्हणून सापडल्याने खळबळ उडाली होती. यातील अन्य संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले तरी मालक शेट्टी बंधू पसार होते. अखेर ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक करत न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.