सांगली : महापालिका क्षेत्रातील हॉटेल व्यावसायिकांच्या नूतनीकरण फीमध्ये महापालिकेने पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ रद्द करावी, तसेच लॉकडाऊन काळात हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद असताना, पाणी वापर झाला नसल्यामुळे कमीतकमी पाणीपट्टी आकारणीही रद्द करावी, अशी मागणी खाद्यपेय विक्रेता मालक-चालक असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.
असोसिएशनच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील आणि विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. महापालिका क्षेत्रातील हॉटेल, लॉजिंग, रेस्टोरंट व परमिट रूम बिअरबार व्यावसायिकांना महापूर तसेच कोरोनाच्या संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. यामुळे नूतनीकरणाची पाच हजार रुपये फी वाढ रद्द करावी, हॉटेल व्यावसायिकांना या परवान्यामुळे कोणत्याही वेगळ्या सवलती दिल्या जात नाहीत. हॉटेल परवाना फीमध्ये वाढ करण्यापेक्षा परवानाधारकांची संख्या वाढवून त्यांना परवाना देऊन उत्पन्न वाढ करणे सोयीचे होईल. महापालिकेच्या ठेकेदाराकडून हॉटेलमधील कचरा उठावासाठी व्यवसायिकांना दरमहा वेगळा खर्च करावा लागतो. ठेकेदाराकडून वेळेत कचरा उठाव केला जात नाही. वारंवार दरवाढीची मागणी केली जाते. कोरोना प्रादुर्भावामुळे हॉटेलमधील ग्राहक संख्या ५० टक्के ठेवण्याचे आदेश असल्याने व्यावसायिकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष लहू भडेकर, उपाध्यक्ष मिलिंद खिलारे आणि सचिव रमेश शेट्टी यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.