लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: काेराेनाच्या पहिल्या टप्प्यात शिराळा तालुका हॉटस्पॉट बनला होता. मात्र प्रशासनाने प्रभावीपणे राबविलेला ‘शिराळा पॅटर्न’ आज शिराळा तालुक्याला काेराेनामुक्तीपर्यंत घेऊन गेला आहे. तालुक्यात हाेम आयसाेलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या एकमेव रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तसेच दिवसभरात एकही नवीन रुग्ण न आढळल्याने बुधवार, दि. २० रोजी शिराळा तालुका कोरोनामुक्त झाला आहे.
मुंबईसह बाहेरुन ४० हजारपेक्षा जास्त नागरिक तालुक्यात आले हाेते. तालुक्यात आजवर २२३३ रुग्णांना काेराेनाची बाधा झाली हाेती. यापैकी २१३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये ५ महिन्यांची दोन बालके तसेच १०० वर्षीय वृद्धाने काेराेनावर यशस्वी मात केली. शिराळा येथील कोविड सेंटरमध्ये आजपर्यंत ३३२ रुग्ण बरे झाले. बाहेरच्या जिल्ह्यातून अधिकृत अथवा अनधिकृतरित्या आलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंद करून त्यांची दररोज आरोग्य तपासणी, गावपातळीवरील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेऊन बाहेरून आलेल्या व्यक्तींना संस्था कोरोन्टाईन करण्याचा निर्णय मोठा फायदेशीर ठरला. याचबरोबर ५० वर्षांवरील नागरिकांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य झाले. कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे मोठे योगदान यामध्ये आहे.
आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या भेटी व सूचना तसेच तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास रावळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. नितीन जाधव, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. गणेश राजमाने आदींनी केलेले नियोजन जनजागृती यामुळे हे यश मिळाले आहे.
चौकट
तालुक्यात आज अखेरचे रुग्ण : २२३३
काेराेनामुक्त झालेले रुग्ण : २१३८
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण : ९५.७४ टक्के
उपचाराखाली असणारे रुग्ण : ०
एकूण मृत्यू : ९५
मृत्यूचे प्रमाण : ४.२ टक्के
चाैकट
शिराळा कोविड रुग्णालयाचे यश
दाखल रुग्ण : ४५८
बरे झालेले : ३३२
पुढे पाठवण्यात आलेले रुग्ण : १०४
मृत्यू : २२
--------------
हॉटस्पॉट ते काेराेनामुक्ती
तालुक्यात पहिला रुग्ण निगडी येथे २४ एप्रिलला आढळून आला. यानंतर प्रशासनाने स्वत:च्या पातळीवर काेराेनाविराेधी लढा प्रभावीपणे चालविला. शिराळा तालुका प्रशासनाने राबविलेला कोरोना चाचणी करणारी रुग्णवाहिका, शिराळा नगरपंचायतीची भेट पथक व्हॅन आदींची राज्यभर चर्चा झाली. याचेच फलित म्हणून २० जानेवारी राेजी तालुका काेराेनामुक्त ठरला.