सांगली : गुजरात, मध्य प्रदेशासह महाराष्ट्रात दिवसा घरफोड्या केलेल्या सॅमसन रुबीन डॅनिअल (वय २५, रा. बेतुरकर पाडा, कल्याण पश्चिम, जि. ठाणे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण व विश्रामबाग पोलिसांनी सुरत मधून अटक केली. त्याच्याकडून सांगलीतील भरदिवसा केलेली घरफोडी उघडकीस आणून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.अधिक माहिती अशी, स्फूर्ती चौकातील दत्तात्रय संपतराव पाटील यांच्या घरात दि.१३ ऑगस्ट रोजी भरदिवसा चोरी झाली होती. सोन्याचे साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले होते. त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दिवसा घरफोड्या करणाऱ्यांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक पथक स्थापन केले होते.विशेष पथकातील हवालदार सागर लवटे यांना स्फूर्ती चौकातील चोरी सॅमसन डॅनिअल याने केल्याची माहिती मिळाली. त्याचा माग काढत असताना तो सूरत (गुजरात) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक सावंत यांच्या पथकाने सुरतला जाऊन डॅनिअलला अटक केली. पोलिस कोठडीत त्याची चौकशी केली. तेव्हा सांगलीतील चोरीची कबुली दिली. चौकशीत त्याने चोरीचा ऐवज वांगणी (जि. ठाणे) येथे ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन सोन्याचा नेकलेस, गंठण, लक्ष्मीहार, तीन अंगठ्या असा साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक सावंत, पंकज पवार, अंमलदार सागर लवटे, दरिबा बंडगर, सतीश माने, अनिल ऐनापुरे, संदीप नलवडे, सोमनाथ गुंडे, विनायक सुतार, विश्रामबाग ठाण्याकडील निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, अंमलदार बिरोबा नरळे, महंमद मुलाणी, प्रशांत माळी, सुनील पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.
सांगलीत प्रथमच भरदिवसा चोरीबंद घरफोड्या करण्यात माहीर असलेला डॅनिअल रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर कल्याण, रत्नागिरी, जळगाव, सुरत (गुजरात), खांडवा (मध्य प्रदेश) या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सांगलीत पहिल्यांदाच त्याने भरदिवसा चोरी केली होती.