कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथे एका घरात गॅस सिलिंडरमध्ये गळती होऊन भीषण आग लागली. यात संसारोपयोगी साहित्य जळून लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थ व अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ही घटना बुधवारी रात्री पावणेअकरा वाजता घडली.
कुरळप येथील माळी गल्लीत महेंद्र माळी यांचे घर आहे. या घरांमध्ये गेल्या बारा वर्षांपासून देवडे (ता. वाळवा) येथील अंजली कदम या अंगणवाडी सेविका भाडेकरू म्हणून राहतात. वीजबिल थकल्याने विद्युत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरातील वीज पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे बुधवारी रात्री त्या मोबाईल चार्जिंग करण्यासाठी शेजारील घरात गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांच्या घरातून एक मोठा आवाज आला आणि बघता बघता घरामध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत वारणा दूध संघ व इस्लामपूर येथील अग्निशमन विभागाला घटनास्थळी पाचारण केले. शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. गॅस गळती होऊनही स्फोट न झाल्याने इतर घरांना धोका झाला नाही.
अंजली कदम या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. त्यामुळे कुटुंब चालवणे अवघड. त्यातच वीज बिलही थकीत आहे. आता तर या आगीत राहत्या घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचा आधारच गेला. या कुटुंबास आर्थिक मदतीची गरज आहे. तलाठी देवराम आडारे यांनी या घटनेचा पंचनामा करून मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.