सांगली : रेमडेसिविरच्या टंचाई काळात आता त्यावरील नियंत्रणाचा विषय चर्चेत आला आहे. मागणीनुसार खासगी कोविड रुग्णालयांमध्ये पाठविल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर होतो किंवा नाही, याची तपासणी होणार कशी, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित होत आहे. राज्यभरात इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत असताना नातेवाईकांमधील हा गोंधळ अधिक वाढत आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनची जिल्ह्यात थेट विक्री बंद केली आहे. राज्यातही तसेच निर्बंध असतानाही अनेक ठिकाणी याचा काळाबाजार झाला. शासकीय चौकटीतून मागणीप्रमाणे इंजेक्शनचा पुरवठा होत असताना त्याची परस्पर विक्री होत असल्याने चिंता वाढली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या रेमडेसिविरची मागणी वाढत आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयांमधून डॉक्टरांकडून मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्यांना हा पुरवठा केला जातो, त्यांच्याकडून त्याचा वापर होतो किंवा नाही, याची तपासणी करणारी यंत्रणा नाही.
सद्यस्थितीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. अशा स्थितीत याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा उभी करणे शक्य नसल्याचे सांगितले जाते. तरीही आधुनिक साधनांच्या माध्यमातून रेमडेसिविरच्या वापराबाबत काही उपाय करता येऊ शकतात, याविषयी विचार होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत रेमडेसिविरची मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तफावत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ सुरू आहे.
चौकट
का आहे गोंधळ?
कोविड रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश नसतो. डॉक्टर व तेथील कर्मचारी यांचाच वावर असतो. अशिक्षित किंवा अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना नेमकी कोणती औषधे दिली जात आहेत, याची कल्पना नसते. त्यामुळे नातेवाईकांना इंजेक्शन दिले आहे की नाही, याची खात्री होत नाही. तशीच खात्री शासकीय यंत्रणेलाही. त्यामुळे गोंधळ वाढला आहे.
चौकट
असे होते वितरण...
कोविड रुग्णालयांकडून किती रुग्णांना रेमडेसिविरची आवश्यकता आहे त्याची यादी करून त्याप्रमाणे जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांना मागणी करावी लागते. त्यानंतर त्याची छाननी करून उपलब्ध इंजेक्शन व मागणी यांचा विचार करून ही इंजेक्शन संबंधित रुग्णालयांना पाठविली जातात. त्यानंतर त्या इंजेक्शनचा वापर संबंधित रुग्णालयांमार्फत होतो.