तासगाव : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव तालुक्यात तत्त्वतः मंजूर झाले, त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. शिवाय परिसराचा विकास होणार आहे; मात्र आमदार अनिल बाबर आणि वैभव पाटील यांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यांना तासगाव तालुक्यातील मते चालतात, पण विकास नाही, असा आरोप महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस राजीव मोरे यांनी केला आहे.
ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र सांगली जिल्ह्यात मंजूर करण्यासाठी २०१३ मध्ये आम्ही आंदोलन केले होते, जिल्हाधिकारी कार्यालयावर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला होता. आता मंजूर उपकेंद्र पळविण्याचा प्रयत्न करणारे त्यावेळी कुठेही नव्हते किंवा त्यांना विद्यार्थ्यांच्या अडचणींशी काहीही देणे-घेणे नाही. यांना केवळ राजकारण करायचे आहे.
विद्यापीठ उपकेंद्र स्वतःच्याच मतदार संघात नेण्यासाठी ते काय महाविद्यालय आहे का?, शिराळा ते जतपासून माणपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यवर्ती ठरेल अशा ठिकाणची जागा यापूर्वी कुलगुरू समितीने तासगाव तालुक्यात निश्चित केली आहे, मात्र आता अचानक जागे होऊन खानापूर तालुक्यातील नेते उपकेंद्र पळविण्यासाठी धडपडत आहेत.
तासगाव तालुक्यात उपकेंद्रासाठी सर्व त्या सुविधा उपलब्ध आहेत. शासनाने एकदा मंजूर केल्यानंतर खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील नेते आता उपकेंद्र मागणीसाठी धडपडत आहेत. खानापूर तालुक्यातील नेत्यांना तासगाव तालुक्यातील २१ गावांतील मतदान चालते, मग या भागात विद्यापीठ उपकेंद्र येत असेल, तर त्यांना त्याची अडचण का वाटत आहे? त्या नेत्यांनी आता आम्हाला या गावातील विद्यार्थी आणि नागरिकांची गरज नाही, असे तरी घोषित करावे.
तुम्हाला जे काही राजकारण करायचे ते इतर प्रश्नांवर करावे, विद्यार्थी समस्येवर नको. तासगाव तालुका मध्यवर्ती असल्यानेच समितीने ही जागा निश्चित केली आहे. जर यामध्ये राजकारण झाले, तर आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशाराही राजीव मोरे यांनी दिला.