दुधगाव : मिरज तालुक्यातील दुधगाव येथील वारणा नदीवरील साठ वर्षांपूर्वीच्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे. हा बंधारा धोकादायक बनला असून, पाटबंधारे विभाग आणखी किती बळींची वाट बघणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
दुधगाव येथील वारणा नदीवरील बंधाऱ्यात काही दिवसांपूर्वी युवकाचा बळी गेला आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये पोहायला गेलेल्या सोहेल शेख या युवकाचा बंधाऱ्याच्या निसटलेल्या दगडांमध्ये अडकून मृत्यू झाला होता.
या युवकाचा मृतदेह काढण्यासाठी तीन आपत्कालिन पथके तीन दिवस काम करत होती. दगडामध्ये अडकलेला मृतदेह प्रयत्नांची पराकाष्ठा करून काढावा लागला. त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या फंडातून निधी मिळाला आहे. लवकरच दुरुस्तीचे काम सुरू होईल.
दि. २७ मार्च रोजी अधिकाऱ्यांनी या बंधाऱ्याची पाहणी करून लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजअखेर कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. सध्या अनेकजण फिरण्यासाठी, तो पाहण्यासाठी बंधाऱ्यावर जातात. पावसाळा सुरू होत असल्यामुळे कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
चौकट
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मतदार संघातील दुधगाव बंधारा धोकादायक बनला आहे. याकडे पाटील यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारीही दुर्लक्ष करत आहेत.
कोट
बंधाऱ्याच्या कामाचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवला आहे. तो मंजूर होऊन आल्यानंतरच कामाला सुरुवात केली जाईल.
- नेहा देसाई, शाखाधिकारी, पाटबंधारे विभाग, पेठवडगाव