सांगली : शहरात दररोज नळाला पाणी येते. पण ते किती शुद्ध आहे? याबाबत नागरिकांना अनेकदा संभ्रम असतो. महापालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात येते. पण गटारीतून गेलेल्या वाहिन्या, ठिकठिकाणची गळती यामुळे अनेकदा नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यासाठी नागरिकांनी सजग होऊन शुद्ध पाण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.
महापालिकेने शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी गेल्या काही वर्षात विविध पावले उचलली आहेत. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने ७५ एमएलडीचे अत्याधुनिक केंद्रही सुरू केले आहे. या केंद्रातून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पाणीपुरवठा होतो, तर मिरजेसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आहे. शहराच्या गावठाण परिसरात पाण्याचा तुटवडा तसा कमीच जाणवतो. पण उपनगरांत मात्र अनेकदा पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी असतात. गावठाण परिसरात अशुद्ध पाण्याबाबत तक्रारी होत आहेत. या परिसरात गटारीतून, ड्रेनेज वाहिनीजवळूनच पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकदा गटारीचे, ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीत मिसळत असते. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येते. महापालिकेकडून मात्र नागरिकांना शुद्ध पाण्याचाच पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जाते. दररोज आठ ठिकाणचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. आजअखेर अशुद्ध पाण्याचा अहवाल आलेला नाही.
शहरात आठ ठिकाणी घेतले जातात नमुने
पिण्याचे पाणी किती शुद्ध आहे, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दररोज आठ विविध ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले जातात. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. दररोज वेगवेगळ्या भागातून नमुने संकलित होतात. एखाद्या भागात नळाला खराब पाणी आल्यास तातडीने तेथील नमुने घेतले जातात. त्या पाण्याची तपासणी होते. कुठे गळती असेल तर तातडीने वरिष्ठांना कळविले जाते.
अशी हाेते तपासणी...
दररोज विविध ठिकाणांहून घेतलेले पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. तिथे पाणी पिण्यास योग्य आहे का? याची तपासणी केली जाते.
या पाण्याच्या नमुन्यात मलमूत्र आहे का, क्लोरिनची मात्र योग्य आहे का, याची तपासणी करून, प्रयोगशाळेकडून पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला जातो. एखाद्या वाहिनीला गळती असेल तरच अशुद्ध पाण्याचा अहवाल येतो.
महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज १३५ लिटर पाण्याचा पुरवठा होतो. दररोज पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. कुठे खराब पाण्याची तक्रार आल्यास जागेवरच क्लोरिनच्या मात्रेची तपासणी केली जाते. त्यात कुठे अशुद्धता आढळल्यास हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले जातात.
- फारुक मुल्ला, केमिस्ट, पाणीपुरवठा अधिकारी