सांगली : जिल्ह्यात आजपर्यंत सहा लाख ६३ हजार ९१५ नागरिकांनी पहिला डोस, तर एक लाख ४३ हजार ७७५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ‘डेल्टा प्लस’ची चिंता सतावत असताना लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण केवळ सात टक्के आहे. ऑनलाईन नोंदणी होत नसल्यामुळे वयोवृध्दांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. देशभरातही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्यात ४५ ते ६० वयोगट तर पाचव्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातले लसीकरण सुरू करण्यात आले. केवळ एक-दोन दिवस विक्रमी लसीकरण होऊन चालणार नाही, तर त्यामध्ये सातत्य बाळगावे लागणार आहे. जिल्ह्यात आजवर सर्वाधिक लसीकरण वाळवा तालुक्यात, तर सर्वात कमी लसीकरण जत तालुक्यात झाले आहे.
डेल्टा प्लस विषाणूविरोधात लढायचे असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लसींचा पुरेसा पुरवठा, दररोजच्या लसीकरणाची संख्या वाढवणे यावर भर देणे गरजेचे आहे. आतापर्यंत दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये आरोग्य कर्मचारी ८२ टक्के, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ६५ टक्के, ६० वर्षांवरील नागरिक ३५ टक्के आहेत. ४५ ते ५९ या वयोगटातील १४ टक्के नागरिकांनी, तर १८ ते ४४ या वयोगटातील ०.४५ टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. अनेक नागरिकांना पहिला डोस घेऊन तीन महिने झाले तरीही त्यांना दुसरा डोस मिळत नाही. ऑनलाईन नोंदणीच व्यवस्थित होत नसल्यामुळे वयोवृध्दांची गैरसोय होत आहे.
चौकट
जिल्ह्यातील लसीकरण : ८,०७,६९०
पहिला डोस : ६,६३,९१५
दुसरा डोस : १,४३,७७५
केंद्रे : २८८
चौकट
जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण ४.४५ टक्के
- जिल्ह्यात लसीकरण अत्यंत कमी गतीने होत आहे. अनेक ठिकाणी रांगामध्ये उभे राहूनही लस मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील ४.४५ टक्के नागरिकांना पहिला डोस दिला आहे. दुसरा डोस तर केवळ ०.४५ टक्केच नागरिकांना मिळाला आहे.
- जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने लसीकरणाची गती वाढवली नाही तर ‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार आहे, असा प्रश्न वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.