संतोष भिसेसांगली : ‘वेदांतने दुकानातून मद्य विकत आणले. ते शुद्ध आहे की अशुद्ध हे कसे ओळखायचे?’ हा प्रश्न विचारला होता चक्क नास (नॅशनल ॲचिव्हमेंट सर्व्हे) परीक्षेत सातवीच्या विद्यार्थ्यांना. अर्थात, त्यात घाईगडबडीने नंतर दुरुस्तीही करण्यात आली.
सोमवारी जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नास परीक्षा झाली. शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या व शालेय गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या ‘जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था’ (डाएट) मार्फत प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. त्यामध्ये मराठी भाषेचे अक्षरश: धिंडवडे काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले. वेदान्त हा शब्द ‘वेदांत’ असा लिहिला होता. प्रश्न क्रमांक ३५ हा ‘मद्य शुद्ध की अशुद्ध कसे ओळखले जाईल?’ असा होता. ‘मधा’ऐवजी ‘मद्य’ असा उल्लेख होता. मद्याची शुद्धता ओळखण्यासाठी चव घेणे, वास घेणे, रंगावरून ओळखणे, आदी चार पर्यायही दिले होते.
मधाचे झाले होते मद्य संबंधित प्रश्नामध्ये मद्याऐवजी ‘मध’ असा शब्द अपेक्षित आहे, त्यामुळे सर्व शाळांनी आपल्या स्तरावर प्रश्नपत्रिकेत काळ्या बाॅलपेनने दुरुस्ती करूनच ती विद्यार्थ्यांना द्यावी, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी फर्मावले. शिक्षकांनी आदेशाचे तंतोतंत पालन केले, त्यामुळे विद्यार्थ्यांचा बचाव झाला.
अशुद्ध मराठी लेखनही प्रश्नपत्रिका म्हणजे अशुद्ध मराठी लेखनाची परिसीमाच ठरली. त्यात छापलेले काही अशुद्ध शब्द आणि कंसात अपेक्षित शुद्ध शब्द असे : दिघू (दिगू), कश्याचा (कशाचा), तीचे (तिचे), लान (लहान).