सांगली : शहरातील काँग्रेस भवन ते महापालिका या रस्त्यावर वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला नागरिकांसाठी फूटपाथही आहेत. पण या फूटपाथवर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना चालताही येत नाही. फूटपाथवर दुकानांच्या फलकांसह वाहनेही लावलेली असतात. त्यावर कारवाईकडे महापालिका व वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे.
स्टेशन रस्ता म्हणून ओळख असलेल्या या परिसरात दररोज हजारो वाहनांची गर्दी असते. आझाद चौकातील व्यापारी संकुलासमोर तर दुचाकींची रांग लागलेली असते. आझाद चौकापासून स्टेशन चौकापर्यंत नावालाच फूटपाथ आहे.
चौकट
रोज हजारो लोकांची ये-जा
आझाद चौक ते स्टेशन चौक या रस्त्यावर दररोज हजारो लोकांची ये-जा सुरू असते. या रस्त्यावर हाॅटेल्स, मोबाईल, इलेक्ट्राॅनिक्सचीस दुकाने आहेत. न्यायालय, महापालिका यासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे.
चौकट
फूटपाथ कागदावरच
या रस्त्यावर पेव्हिंग ब्लाॅकचे फूटपाथ करण्यात आले आहे. पण ते नावालाच आहेत. बहुतांश ठिकाणी दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. दुकानांचे फलक फूटपाथवर लावलेले असतात. दुचाकी गाड्याही फूटपाथवरच पार्क कलेल्या असतात. त्यामुळे पायीही चालता येत नाही.
चौकट
अतिक्रमण हटाव केवळ दाखवायलाच
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक दिवसातून दोन ते तीनदा या रस्त्यावरून ये-जा करीत असते. पण या पथकाला कधी तरीच अतिक्रमण दिसते. दिखाव्यापुरतीच कारवाई होते. नंतर मात्र, ये रे माझ्या मागल्या... प्रमाणे फूटपाथ गायब होते.
चौकट
वाहनांची भीती वाटते
स्टेशन रस्त्यावर आधीच वाहनांची गर्दी असते. त्यात फूटपाथवरूनही जाता येत नाही. अनेकदा अतिक्रमणामुळे रस्त्यावरून चालत जावे लागते. तेव्हा वाहनांची भीती वाटते.
- संदीप आपटे
चौकट
चालत जाताना भीती
स्टेशन रस्त्यावर दररोज नसले तरी, आठवड्यातून तीन-चारवेळा तरी जावे लागते. वाहनांची वर्दळ असल्याने कसे चालायचे? असा प्रश्न पडतो. फूटपाथ हा नागरिकांसाठी आहे, याचाच विसर अनेकांना पडला आहे.
- शामराव भोसले
चौकट
अधिकारी म्हणतात...
सध्या कोरोनामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळे येत आहेत. तरीही महापालिकेच्या पथकाकडून कारवाई सुरूच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यास महापालिकेने प्राधान्य दिले आहे. वेळोवेळी महापालिकेने फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे.
- दिलीप घोरपडे, अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख