इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत शहराच्या विकासासाठी आलेला निधी व त्यातून झालेला विकास हा राष्ट्रवादी नेत्यांच्या डोळ्यांत खुपत असल्याने स्वत: जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अस्वस्थ झाले आहेत. ज्यांनी सभागृहातच अकार्यक्षम असल्याची कबुली दिली, त्या शहाजी पाटील यांना शहरात कोणती विकासकामे झाली, त्यासाठी किती निधी आला हे कसे माहीत असणार, असा पलटवार विकास आघाडीचे उपाध्यक्ष, नगरसेवक वैभव पवार यांनी केला.
राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पवार यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यामध्ये ३० वर्षे एकहाती सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे कर्तबगारी असती तर शहरात एकही विकासाचे काम शिल्लक राहिले नसते. या काळात त्यांनी फक्त आश्वासने दिली. चार वर्षांत तत्कालीन राज्य सरकारने समाधानकारक निधी दिल्याने अनेक महत्त्वपूर्ण योजना व विकासकामे पूर्ण झाली आहेत. राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता गेल्याने जयंत पाटील यांना धक्का बसला होता. याचा बदला घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचे बगलबच्चे गल्लोगल्ली फिरत आहेत. नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील आणि विकास आघाडीच्या कारभाराबाबत जनतेची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
पवार म्हणाले, निशिकांत पाटील हे स्वत:च्या कर्तबगारीने मोठे झालेले नेतृत्व आहे. त्यांना कोणाचे नाव घेऊन मोठे व्हायचे कारण नाही. सध्या राज्याच्या सत्तेत असणाऱ्या जयंत पाटील यांनी शहरासाठी किती निधी आणला, हे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सांगावे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सुरू असलेली प्रसिद्धीसाठीची स्टंटबाजी बंद करावी. शहरातील जनता सूज्ञ आहे, याचे भान त्यांनी ठेवावे.