इस्लामपूर-शिराळ्यात महायुतीच्या उमेदवारीसाठी नेत्यांचा कस, जयंत पाटील यांना आव्हान देण्याची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:25 PM2024-08-23T17:25:01+5:302024-08-23T17:25:39+5:30
महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा
अशोक पाटील
इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. विशेषत: दक्षिण महाराष्ट्रातील इस्लामपूर, शिराळा, तासगाव या मतदारसंघांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार शोधण्यासाठी कस लागणार आहे.
राज्यातील महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील उमेदवार निवडीसाठी चाचपणी सुरू केली आहे. दक्षिण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत, त्या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाव्यात, असा सूर राष्ट्रवादीतून आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर-शिराळा मतदारसंघावर जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. तासगाव मतदारसंघात दिवंगत नेते आर. आर. पाटील गटाचा वरचष्मा आहे. येथे त्यांचे पुत्र रोहित पाटील यांनी लढण्यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे या तीनही मतदारसंघांत उमेदवार शाेधण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा
इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात अजित पवार गटाने चाचपणी सुरू केली आहे. तालुकाध्यक्ष केदार पाटील यांनी राष्ट्रवादीची बांधणी जोमाने सुरू केली आहे. दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याविरोधात भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुकांनी विधानसभेसाठी जाेरदार तयारी चालविली आहे. यामुळे महायुतीचा उमेदवार निवडताना नेत्यांचा कस लागणार आहे.
मानसिंगराव नाईक यांच्या निधीवरून चर्चा
राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात केवळ आमदार मानसिंगराव नाईक यांनाच निधी मिळाला. त्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनीच हा निधी दिला. त्यामुळे भविष्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतूनच ते उमेदवारी घेतील, अशा राजकीय चर्चेला शिराळ्यात उधाण आले आहे; परंतु मानसिंगराव नाईक हे आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत ठाम असल्याचे सांगतात.
राज्यात जिथे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत, अशा सर्व जागा अजित पवार गटाला मिळाव्यात; परंतु काही ठिकाणी महायुतीकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करण्याचा विचार व्हावा. मतदारसंघातील अंदाजित चाचपणीनुसार ज्या पक्षाला पसंती मिळेल, त्याला उमेदवारी देण्यात यावी. - वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)