सांगली : सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या सांगलीविधानसभा मतदारसंघात विरोधी काँग्रेसने गेल्या दोन वर्षांपासून जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनीही गेल्या दोन वर्षांत अनेकदा या मतदारसंघातून लढण्याची भूमिका मांडल्याने महाविकास आघाडी म्हणून एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांमधूनच शंका उपस्थित केली जात आहे.सांगली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरते. मागील निवडणुकीत भाजप व काँग्रेसमध्ये झालेली काट्याची लढत राज्यभर चर्चेची ठरली होती. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा निसटता पराभव झाला. भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हे ताकदीचे उमेदवार असल्याने येथील लढत एकतर्फी होईल, असा अंदाज भाजपच्या नेत्यांनी बांधला होता. या अंदाजाला मोठे तडे गेले होते.काट्याच्या लढतीमुळे काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. पुढील निवडणुकीतील दावेदारी भक्कम करीत पाटील व त्यांच्या समर्थकांनी सतत राजकारणात सक्रिय राहण्यास प्राधान्य दिले. दुसरीकडे भाजपनेही तेवढीच तयारी केली आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेस उमेदवाराला चांगली साथ दिली, मात्र काँग्रेसअंतर्गत गटबाजीची चर्चा निवडणुकीनंतर सुरु झाली. राज्यभर या गटबाजीचा गवगवा झाला. काँग्रेसअंतर्गत गटबाजीचा प्रश्न कायम असून राष्ट्रवादीच्या दावेदारीचा अडथळाही काँग्रेसला वाटू लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीचे गणित सांगलीत कसे जुळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जयंतरावांच्या भूमिकेकडे लक्षकाँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यालयास जयंत पाटील यांनी भेट दिल्याने महाविकास आघाडीच्या समीकरणांची चर्चा सुरू आहे. तरीही ऐनवेळी निवडणुकीत राष्ट्रवादी काय करेल, याचा अंदाज नसतो, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे. तसा अनुभवही त्यांना अनेकदा आला आहे.