सांगली : कृष्णा नदीच्याप्रदूषणमुक्तीसाठी शनिवारी अवघ्या सांगलीकरांनी एकजूट केली. मानवी साखळीद्वारे कृष्णेच्या मूक वेदनांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. तिच्या बेसुमार प्रदूषणावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण करणाऱ्या बेजबाबदार सांगलीकरांना साकडे घातले.सकाळी सातपासूनच अनेक सांगलीकरांनी आयर्विन पुलाजवळ गर्दी केली होती. नागरिक विकास मंचने साखळी उपक्रमाचे नेतृत्व केले. विविध संस्था, संघटना, शाळा, व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी सहभागी झाले. हरभट रस्ता, कापड पेठ, गणपती मंदिर व कृष्णा नदी अशी साखळी धरण्यात आली. सहभागी नागरिकांनी कृष्णेच्या प्रदूषणाविरोधातील घोषवाक्यांचे बॅनर्स फडकावले होते. पर्यावरणवादी संस्थांनी प्रदूषणमुक्तीसाठीच्या उपाययोजना फलकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. शाळकरी विद्यार्थ्याच्या हस्ते प्रदूषण नियंत्र मंडळाचे अधिकारी नवनाथ अवताडे यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हंटले आहे की, कृष्णेत मळीयुक्त पाणी मिसळल्याने लाखो माशांचा प्रतिवर्षी मृत्यू होतो. त्याची कारणे आणि प्रदूषणाची केंद्रे वेगवेगळी आहेत, मात्र नदीचे पाणी विष बनत आहे. प्रदूषण अत्यंत गंभीर वळणाकडे जात आहे. कृष्णेची अवस्था पंचगंगा नदीसारखी होऊ नये यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे.उपक्रमात विद्यार्थी, महिला, फेरीवाले, रिक्षावाले, हमाल, माथाडी, बांधकाम कामगार हेदेखील सहभागी झाले. संयोजन पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर आदींनी केले.आंदोलकांनी कृष्णा प्रदूषण मुक्त होण्यासाठी सुचविलेली उपाय असे...
- उगमापासून राजापूर बंधाऱ्यापर्यंत सर्वेक्षण करा. तज्ज्ञ समितीद्वारे प्रदूषणकारी घटक निश्चित करा.
- कृष्णा-वारणाकाठावरील साखर कारखान्यांनी रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे करावेत, मगच त्यांना गाळप परवाना द्यावा.
- औद्योगिक क्षेत्रालाही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सक्तीचे करा, उभारणीसाठी कालमर्यादा निश्चित करा.
- नदीकाठावरील २९ गावे, तीन नगरपालिका, सांगली महापालिकेचे सांडपाणी प्रक्रियेनंतरच नदीत सोडावे, यासाठी तत्काळ निधी द्या.
- नदीकाठची शेती अधिकाधिक सेंद्रिय होण्यासाठी जागृती व प्रोत्साहन कार्यक्रम राबवा.