संबंधित पोल्ट्री मालकाने या कोंबड्यांची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्याऐवजी सर्वच मृत कोंबड्या ट्रॅक्टरच्या टॉलीमध्ये भरून जवळच असलेल्या जुन्या वज्रचौंडे बंधाऱ्यालगतच्या परिसरामध्ये उघड्यावर फेकल्या आहेत.
मळणगाव-नागेवाडी रस्त्यावर पाच हजार कोंबड्यांची दोन शेड आहेत. मंगळवारी सायंकाळी शेडमधील शेकडो कोंबड्या अचानक मृत्युमुखी पडल्या. ही धक्कादायक बाब संबंधित पोल्ट्रीमालकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनाला कळविण्याचे सोडून गुप्तता पाळली. अंधार पडल्यानंतर पोल्ट्रीमालकाने सर्व मृत कोंबड्या टॉलीत घालून उघड्यावर फेकल्या.
काही वेळातच तिथे असलेल्या मोकाट कुत्र्यांनी व प्राण्यांनी त्या कोंबड्यांचा फडशा पाडायला सुरुवात केली. फेकलेल्या ठिकाणापासून पोल्ट्री शेडपर्यंत ठिकठिकाणी कुत्री कोंबड्या तोंडात घेऊन फिरत होती. या वाटेवर कोंबड्या पडलेल्या होत्या. अचानक कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.