दिलीप मोहिते विटा : दारिद्र्य तसेच भटकंतीमुळे शाळेकडे पाठ फिरविलेल्या परप्रांतीय चिमुकल्यांनी विट्यात आश्रय घेतला आहे. आई-वडिलांनी घेतलेली पैशाची उचल फेडण्यासाठी शेकडो परप्रांतीय बालकामगार मालकांकडे राबत आहेत. शहरातील चायनीज पदार्थ, पाणीपुरीचे गाडे, बेकरी, चहा टपरी, बांधकाम, तसेच भंगार व्यवसायासह अन्य ठिकाणी त्यांचा सर्रास वापर होत आहे.विटा शहरात भंगार व्यवसायात उत्तर प्रदेश, बिहार, बेकरी उत्पादनात राजस्थान, गुजराती, उडपी, तसेच सुवर्णालंकार व्यवसायात बंगाली, तर बांधकाम व्यवसायात कर्नाटकातील बेळगाव परिसरातील अनेक बालकामगार राबत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी तुटपुंज्या पगारावर, तर काही बालकामगार केवळ दोनवेळचे जेवण व राहण्याची सोय होत असल्याने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी बालकामगार आपापल्या राज्यातून आणले आहेत.
या बालकामगारांना रात्रंदिवस कामात जुंपले जात असल्याचे समजते. या चिमुरड्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण होत आहे. परप्रांतातून आणताना त्यांच्या पालकांच्या हातावर वर्षाचे केवळ पाच-दहा हजार रुपये एकरकमी ठेवले जातात. त्यामुळे त्यांचे मालक कामगारांची खरेदी केल्यासारखी वागणूक या चिमुरड्यांना देत असतात.या बालकामगारांना बेकरी उत्पादन तयार करताना आगीच्या भट्टीसमोर, सुवर्णालंकार बनविताना अॅसिडच्या धुरात काम करावे लागते. भंगार जमा करताना लोखंडी साहित्याची वाहतूक करणे, चायनीज, पाणीपुरीचे हातगाडे ढकलत तासन् तास रस्त्यावर उभे राहणे यासह अन्य कामेही करावी लागतात. हॉटेल्स व कोल्ड्रींक्स व्यवसायातही अनेक बालकामगार राबत आहेत. सर्वाधिक बालकामगार बांधकाम व्यवसायात असल्याचे समजते. त्यांच्याकडून बांधकामाच्या मजल्यावर सिमेंट, वाळू, वीट, खडी अशा साहित्याची वाहतूक करवून घेतली जाते.