मांजर्डे : तासगाव तालुक्यातील बस्तवडे व सावळज या गावांमध्ये जलक्रांती करण्यासाठी हजारो जलमित्रांचे हजारो हात राबले. यामुळे तालुक्यातील गावांना पानी फौंडेशन वॉटर कप स्पर्धेसाठी प्रोत्साहन मिळाले. जलमित्रांच्या तुफानामुळे तालुक्यातील गावांना एक आदर्श मिळाला आहे.तासगाव तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पानी फौंडेशनचे काम सुरू आहे. तालुक्यात या पाणी चळवळीसाठी ६९ पैकी ४९ गावांनी सहभाग घेतला असून, पैकी सावळज, बस्तवडे या गावांमध्ये महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सावळज येथे सकाळी ६ ते १० व बस्तवडे येथे सायंकाळी ३ ते ७ पर्यंत महाश्रमदान आयोजित केले होते. हजारो जलमित्रांच्या सहभागामुळे महाश्रमदान पार पडले.चार दिवसांपासून जोरदार तयारी सुरू केली होती. यासाठी राज्यभरातून हजारो जलमित्रांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. ग्रामस्थांच्या बरोबरीने शासकीय यंत्रणासुद्धा या नियोजनात होती. कोठे कोणते काम करायचे, याची सर्व माहिती घेऊन काम करण्याच्या ठिकाणी आखणीसुद्धा करण्यात आली होती. जलमित्रांसाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी पाणी, मठ्ठा, जेवण यांची उत्तम सोय करण्यात आली होती.जलमित्रांनी सावळज व बस्तवडेमध्ये येऊन श्रमदान केले. ‘एक दिवस पाण्यासाठी’ या उद्देशाने राज्यभरातून आलेल्या जलमित्रांनी श्रमदान केले. त्यांच्या बरोबरीला नियोजनासाठी गावचे ग्रामस्थ होतेच; परंतु श्रमदानासाठी गावातील दिव्यांगही सहभागी झाले होते.-------------
तासगाव तालुक्यातील बस्तवडे, सावळजला राबले हजारो हात..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 10:24 PM