सांगली : कोरोनाच्या वाढता संसर्गाने आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला दरातील वाढ कायम आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर सरासरी १०० रुपयांवर पोहोचले आहेत, तर खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून या आठवड्यात १५ ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलासह गहू, तांदळाच्याही दरात सरासरी प्रति क्विंटल १५० ते २०० रुपयांची वाढ आहे.
आठवडी बाजार बंद असल्याने सध्या घरोघरी फिरून विक्रेते भाजीपाला विकत आहेत. त्यात भाजीपाला आवकही पूर्ण घटली आहे. पुढील आठवड्यात पुन्हा दर वाढण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या पंधरवड्यापर्यंत ४० ते ६० रुपयांवर असलेला भाजीपाला आता ८० ते १०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
चौकट
लिंबूचे दर वाढले
उन्हाळ्यात लिंबू, काकडीला अधिक मागणी असते. त्यात लिंबूची आवक आणि मागणीत तफावत असल्याने दर वाढले आहेत. सध्या पाच रुपयांना एक लिंबू मिळत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लिंबूलाही मागणी चांगली आहे. काकडीही महाग झाली असून प्रति किलो ५० रुपयांनी मिळत आहे. वांगी, दोडका, गवारीचे दर ८० रुपयांवर पोहोचले आहेत.
चौकट
तेलाचा भडका कायम
गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ कायम आहे. या आठवड्यातही तेलाच्या दरात प्रति किलो १५ ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. सरकी, सूर्यफूल, शेंगदाणा तेल दरात वाढ झाल्याने आता ग्राहकांनी पामतेलाची खरेदी वाढविली असली तरी, या तेलाचेही दर आठवड्यात २० रुपयांनी वाढले आहेत.
चौकट
आंबा येतोय आवाक्यात
कोरोना स्थितीमुळे बाजार बंद असल्याने फळे विक्रीवरही परिणाम झाला आहे. फळे विक्रीस परवानगी असली तरी आता सकाळी ११ पर्यंतच मुभा असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. या आठवड्यात आंबा आवकेत वाढ झाली असून दरही काही प्रमाणात आवाक्यात येत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा दरात १०० रुपयांनी घट झाली आहे.
कोट
शासनाने आठवडी बाजार पुन्हा एकदा सुरू करावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विक्री करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. घरोघरी विक्री करताना अडचणी येत असून त्यामुळे दरात वाढ होत आहे.
- विठ्ठल मासाळ, भाजीपाला विक्रेता
कोट
सध्या किराणा दुकानांना सकाळी सात ते ११ पर्यंतच वेळ आहे. त्यामुळे ग्राहकांवर परिणाम झाला आहे. सध्या मालाची उपलब्धता असली तरी उठाव कमी आहे. दर वाढत असले तरी मालाची विक्री मर्यादित होत आहे.
- अशिष घोरपडे, व्यापारी
कोट
किराणा सामान, भाजीपाला, पेट्रोल सगळीकडेच दरवाढ आहे. त्यात कोरोनामुळे काम बंद आहे. पण दरवाढ काही थांबत नाही. याचा आम्हा मध्यमवर्गीय कुटुंबांना त्रास होत आहे. शासनाने आता मालाचे दर स्थिर राहतील याकडे विशेष लक्ष द्यावे.
- कमल भोसले, गृहिणी