इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथे वंजारी मळ्यात राहणाऱ्या पती-पत्नीने सोमवारी (दि. २२) रात्रभर धुडगूस घालत एकमेकांना दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसात दोघांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.
महादेव रामचंद्र वंजारी (वय ४३) आणि राजश्री महादेव वंजारी (३३) अशी त्यांची नावे आहेत. मारहाणीत दोघांनाही दुखापत झाली आहे.
महादेव रात्री ९.३० च्या सुमारास घरात जेवण करीत होते. त्यावेळी राजश्री तिथे आली. तुम्ही माझ्यासोबत बंगल्यात राहायला येणार आहे का नाही, अशी विचारणा करीत तिने शिवीगाळ केली. रागाच्या भरात दगडाने पती महादेव यांच्या हाताच्या बोटावर मारून जखमी केले. तसेच तुला व तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे महादेव वंजारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
राजश्री हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री अकराच्या सुमारास, घरी चला, असे म्हटल्यावर महादेवने मी येणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. राजश्रीचा मोबाईल फोडून टाकला. दगडाने स्वतःला जखम करून घेत त्याच दगडाने राजश्रीलाही मारून जखमी केले. ‘तू घटस्फोट घे, नाहीतर तुझ्यावर खोटी तक्रार दाखल करतो,’ असे म्हणून मारहाण केली. केस धरून तिला फरफटत नेले.