दगडू आठवले गुरुवारी रात्री आठ वाजता मुंबईला जाण्यासाठी पत्नीसह मिरज रेल्वेस्थानकात आले. रेल्वेच्या प्रतीक्षेत थांबले असताना रेल्वेस्थानक प्रवेशद्वाराजवळ त्यांना त्रास जाणवू लागला. यावेळी फोन केल्यानंतर रुग्णवाहिका वेळेत आली नाही. रेल्वेस्थानकात डॉक्टर किंवा उपचार करणारी यंत्रणा नव्हती. प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासणीसाठी महापालिकेच्या दोन आरोग्यसेविका उपस्थित होत्या.
दगडू आठवले यांची ऑक्सिजन पातळी कमी होऊन त्यांना श्वास घेणे कठीण झाले. काही वेळांत त्यांचा पत्नीसमोरच मृत्यू झाला. रेल्वेची कोणतेही रुग्णवाहिका अगर डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. तातडीने उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. रेल्वेस्थानकात उपचारासाठी रुग्णवाहिका किंवा डॉक्टर नसल्याने यापूर्वीही अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिरज रेल्वे स्थानक जंक्शन असूनही रेल्वेचे डाॅक्टर प्रवाशांच्या उपचारासाठी उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया आहेत.