आटपाडी : चुलत दिरासोबतच्या अनैतिक संबंधातून मासाळवाडी (ता. आटपाडी) येथे पत्नीने पतीचा खून केल्याचे महिन्यानंतर उघडकीस आले. मारुती कोंडिबा तळे (वय ३३) असे मृताचे नाव असून, त्यांचा मृतदेह विहिरीत टाकून अपघात घडल्याचा बनाव करण्यात आला होता. याप्रकरणी मृत तळे यांंची पत्नी माया (२५) आणि तिचा चुलत दीर आकाश तुकाराम तळे (२४) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.
पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी सांगितले की, दि. १५ जून रोजी मारुती तळे यांचा मृतदेह मासाळवाडी येथील विहिरीत आढळून आला हाेता. त्यांची दुचाकीही विहिरीत पडलेली होती. विहिरीत पाण्यात बुडून त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजून प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. दरम्यान। मारुती यांच्या मृत्यूबाबत त्यांचे भाऊ दादासाहेब यांनी संशय व्यक्त केला होता. त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. पोलीस निरीक्षक भानदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, जगन्नाथ पुकळे, रामचंद्र खाडे, सौरभ वसमळे, नीशा येलपले यांनी तपास करून खुनाचा प्रकार उघडकीस आणला.
माया तळे व तिचा चुलत दीर आकाश तळे यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय मारुती तळे यांना होता. यावरून पती-पत्नीत भांडण होत असे. दि. १४ जूनला दोघांत पुन्हा वाद झाला. त्यावेळी आकाश तिथे गेला. मारुती व आकाश यांच्यात झटापट झाली. याचवेळी मायाने जवळच पडलेल्या लाेखंडी पाईपने मारुती यांच्या डोक्यात हल्ला केला. वर्मी मार लागल्याने ते बेशुध्द झाले. त्याच अवस्थेतच दोघांनी मिळून त्यांना जवळच्या विहिरीमध्ये फेकून दिले. त्यांची दुचाकीही विहिरीत फेकून दिली. दि. १५ जून रोजी सकाळी उठल्यावर ते बेपत्ता असल्याचे भासवले. त्याच दिवशी विहिरीत मृतदेह सापडल्यानंतर अपघाताचा बनाव केला.
माया तळे व आकाश तळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मायाला माहेर अनुसेवाडी (ता. आटपाडी) येथून ताब्यात घेण्यात आले. दाेघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील अधिक तपास करत आहेत.