लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गेल्या १८-१९ वर्षांपासून संघटनेत कार्यरत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. असे असताना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे मिळालेले प्रदेशाध्यक्षपद अचानकपणे काढून घेण्यात आले. यात शरद पवार यांचा कोठेही संबंध नव्हता. ते सदैव माझे दैवतच आहेत. मात्र, पद काढून घेतल्याबद्दल महिला नेत्यांवर माझी नाराजी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत मांडली.
राज्य महिला आयोगाच्या कार्यक्रमासाठी त्या जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आठवडाभरापासून बदललेली राजकीय समीकरणे व त्याबाबत मते मांडली.
चाकणकर म्हणाल्या की, सत्तेत सहभागी झालेला गट राष्ट्रवादीच आहे आणि शरद पवार सर्वांसाठीच दैवत आहेत, याबाबत काेणाचेही दुमत नाही. १८-१९ वर्षांपासून संघटनेत काम करताना पदाची अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याला असते. त्यानुसार मलाही पक्षात पदाची संधी मिळाली. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना संधीचे सोने केले. मात्र, अचानक माझ्याकडून पद काढून घेण्यात आले. राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष दोन्ही पदाला योग्य न्याय देत असताना, हा निर्णय मला धक्कादायक होता. शरद पवार यांच्यामुळेच ही संधी मिळाली होती. मात्र, त्यावेळच्या राष्ट्रवादीमधील महिला नेत्यांमुळे मला पदावरून दूर करण्यात आले. माझी नाराजी त्यांच्याबद्दल आहे. शरद पवार यांच्याबद्दल माझी नाराजी नाही.
आता पुन्हा एकदा मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. राज्यातील सर्व महिलांना एकत्र आणून संघटना पर्यायाने पक्षबांधणीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘त्या’ महिला नेत्या कोण?
राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केलेल्या ‘त्या’ महिला नेता कोण हे सांगणे मात्र चाकणकर यांनी टाळले.
जयंत पाटील यांच्याकडून पाठबळचमहिला आयोगात काम करताना किंवा यापूर्वी राष्ट्रवादीची महिला आघाडी सांभाळताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेहमीच सहकार्य मिळाले. त्यांच्याकडून बळ मिळाल्याने संघटना कशी बांधावी याचे धडे मिळाले. शिवस्वराज्य यात्रेसारख्या अभियानातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी पाठबळ दिल्याने जयंत पाटील यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नसल्याचेही चाकणकर यांनी सांगितले.