कडेगाव : आमदार डॉ. पतंगराव कदम गरीब घरात जन्माला आले नसते, तर ते गोरगरिबांचे कैवारी झाले नसते. त्यांनी माझी मुलगी तसेच माझी अनाथ मुले भारती विद्यापीठात सांभाळली व शिकवली. त्यामुळे सिंधुताई ‘अनाथांची माय’ झाली आणि जगाला कळली. मी अनाथांसाठी जे कार्य उभे केले आहे, त्यास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही. भारती विद्यापीठ व जनता हेच माझे सरकार आहे. त्यामुळे मला अनुदानाची गरजही भासली नाही, असे प्रतिपादन सिंधुताई सपकाळ यांनी केले.चिंचणी (ता. कडेगाव) येथे बाळकृष्ण पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील फौंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यानात सिंधुताई सपकाळ बोलत होत्या. यावेळी आ. मोहनराव कदम उपस्थित होते.सिंधुताई म्हणाल्या, संकटात खरी ऊर्जा सामावलेली असते. त्यामुळे संकटांना वेलकम म्हणा. संकटांना बळी न पडता आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करा. आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहायची कोणाची हिम्मत होता कामा नये, इतके महिलांनी व मुलींनी सक्षम व्हायला हवे. विज्ञान युगात वावरत असलो तरी, संस्कृती जपली पाहिजे.वसंतराव माने यांनी प्रास्ताविक केले. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्रा. मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जि. प. सदस्या वैशाली कदम, सरपंच मनीषा माने, उपसरपंच दीपक महाडिक, प्रल्हाद पाटील, डॉ. गौरी पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते. प्रा. सूर्यकांत बुरंग यांनी सूत्रसंचालन केले, तर राहुल पाटील यांनी आभार मानले....आणि सिंधुताई गहिवरल्यामाझा जीवनातील पहिला सत्कार आ. मोहनराव कदम यांनी सांगलीत केला. ज्या गावातून पतीने व नातेवाईकांनी मला दगड मारून हाकलून दिले, त्या माझ्या सासरच्या गावात पतंगरावांनी सत्कार केल्याची आठवण सिंधुतार्इंनी सांगितली. पतंगरावांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे असे सांगताना सिंधुताई यांना अश्रू अनावर झाले.
पतंगरावांमुळेच मी ‘अनाथांची माय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:13 PM