इस्लामपूर : मिरज येथील कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी काही काळ एकाच वाहनातून प्रवास केला. याचे राजकीय मंडळींनी भांडवल केले. यावर खा. शेट्टी यांनी ‘खासदार-आमदार एका गाडीतून आले, तर बिघडले कुठे? आम्ही काय एकमेकांचे बांध रेटले आहेत का?’ असा टोला मारला.खासदार राजू शेट्टी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमची संघटना लढा देत आहे. आघाडी सरकारच्या विरोधातही आम्ही आवाज उठवला आहे. शेतकºयांना न्याय देण्यासाठी प्रसंगी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, लालूप्रसाद यादव यांनाही आम्ही विरोध केला आहे. आमदार जयंत पाटील अर्थमंत्री असताना २००७ मध्ये कोल्हापूर-सांगली हा महामार्ग होणार होता. यामध्ये जयसिंगपूरमधील काही घरे पाडली जाणार होती. त्यावेळी मी स्वत: विरोध केला होता. या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी त्यावेळीही मी आणि जयंत पाटील एकाच गाडीत बसलो होतो.मिरज येथील कार्यक्रमावेळी एकाच गाडीतून प्रवास करण्याचा योगही असाच आला होता. त्याचे कोणीही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करू नये. लोकसभा निवडणुकीला अद्याप कालावधी आहे. जयंत पाटील ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत, त्याच मतदारसंघाचा खासदार आहे. आता आमचे विचार शेतकºयांच्या हिताचेच आहेत. मात्र भाजप शेतकºयांच्या विरोधात आहे. निवडणुकीत भाजपकडून मिळालेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळेच मी त्यांच्यापासून फारकत घेत स्वतंत्रपणे शेतकºयांचा लढा सुरू केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अद्याप कोणत्याही पक्षाला साथ देण्याबाबत विचार केलेला नाही, असेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.
एकाच गाडीतून आलो, तर बिघडले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:26 AM