लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूरचा विकास आणि निधीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि सत्ताधारी विकास आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात संघर्षमय कलगीतुरा रंगला आहे. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने ३० वर्षांत आणलेला निधी आणि आता सत्तेत असलेल्या विकास आघाडीने आणलेला ११४ कोटींचा निधी पाहता, शहराची अवस्था ‘आई जेऊ घालीना, बाप भीक मागू देईना’ अशीच आहे.
सत्तेत असताना राष्ट्रवादीने जयंत पाटील यांच्या माध्यमातून शहराचा चौफेर विकास करण्याचे नियोजन केले होते. यातील बहुतांश विकासकामे मार्गी लागली आहेत. तीही निकृष्ट दर्जाची आहेत, असे आरोपही झाले आहेत. पालिकेच्या नियोजनाअभावी अंबाबाई उद्यानासाठी पूर्वी खर्च केलेले कोट्यवधी रुपये मातीत गेले. त्याठिकाणी नवीन उद्यान उभे केले आहे. त्याच परिसरात असलेल्या पोहण्याच्या तलावाचा बेरंग झाला आहे. शहरात मंत्री कॉलनी आणि विशालनगर येथे उभारलेल्या बागा गेल्या दोन वर्षांपासून नियोजनअभावी भकास होत चालल्या आहेत. विशालनगर येथील नागरिकांनी एकत्रित येऊन, ही बाग आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याची देखरेख करतो, अशी मागणी केली आहे. यावरून पालिकेची आर्थिक स्थिती काय आहे, हे दिसून येते.
या परिसरातील रस्त्यांची अवस्था खडतर आहे. भुयारी गटारीचे तीन-तेरा वाजले आहेत. ज्या ज्या ठिकाणी रस्ते खोदले आहेत, यावर जुजबी डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे हे रस्ते खड्डेमय बनले आहेत. शहरातील काही मुख्य चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले. यावरही पालिकेने लाखो रुपये खर्ची टाकले आहेत. परंतु या चौकांची शोभाच नष्ट होत चालली आहे. तत्कालीन राष्ट्रवादीने केलेल्या विकासाच्या घोषणा पालिकेत सत्ता नसल्याने हवेतच विरल्या आहेत. त्यामुळे मंत्री जयंत पाटील यांनी ग्राऊंडलेवलला येऊन शहराची पाहणी केली आहे. ही स्थिती पाहूनच त्यांच्या बारामती पॅटर्नचा चुराडा झाल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. त्यामुळेच त्यांनी थेट सत्ताधारी विकास आघाडीवर टीका केली आहे. त्याला सडेतोड उत्तरही विकास आघाडीने दिले आहे.
चाैकट
श्रेयवादासाठी भांडण
मंत्री जयंत पाटील व नगराध्यक्ष निशिकांत पाटील या दोघांच्या कलगीतुऱ्यामुळे मात्र शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने गटारींचे नियोजन, रस्ते, स्वच्छता, मालमत्ता वाढीव कर, बांधकामासाठी लागणारे परवाने, काही प्रभागात पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा, कोरोनाबरोबरच आता डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यापेक्षा, नेते मात्र श्रेयवादासाठी भांडत आहेत.
फोटो - जयंत पाटील व निशिकांतदादा पाटील यांचे फोटो व पालिका लोगो