सांगली : ‘मी सक्षमा’तर्फे घेण्यात आलेल्या ‘सेल्फी वुईथ गुढी व वटपौर्णिमा’ या मराठमोळ्या वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच बक्षीस वाटप करण्यात आले. या दोन्ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. स्पर्धेचे वितरण पुजा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कोविड काळामध्ये महिलांमध्ये मानसिक ताण वाढून संतुलन बिघडण्याच्या तक्रारी समोर येत होत्या. अशा काळामध्ये ‘मी सक्षमा’द्वारे खास महिलांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ऑनलाईन बैठकीत चारशे ते पाचशे महिला सहभागी होतात. या महिलांना त्यांच्या आवश्यकतेनुसार व त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांनी सुचवल्यानुसार प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये पाककला, हस्तकला, महिला आरोग्य अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाते.
कोरोनामुळे दोन ऑनलाईन स्पर्धांचा पारितोषिक कार्यक्रम थोडक्यात करण्यात आला. यावेळी सौ. पूजा पाटील यांच्याहस्ते व संघटनेच्या गीतांजली पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सेल्फी वुईथ गुढी स्पर्धेत अनुक्रमे समता राजपूत, स्वाती कुंभार, उल्का यमगर यांना, तर मराठमोळा लूक स्पर्धेत स्मिता मोरे, वसुधा तातुगडे, कल्पना पाटील यांना बक्षीस देण्यात आले. सहभागाबद्दल वैशाली खंचनाळे, सायली गोरे यांचा सत्कार करण्यात आला.