सांगली : विधानसभा कामकाजात शुक्रवार, दि. ५ जुलै रोजी पुण्याला खंडपीठ करण्याचा दाखवलेला अशासकीय ठराव अनावधानाने झाला आहे. तसे पत्र मी सोमवारी अध्यक्ष महोदयांना देणार आहे. तसेच हा विषय कामकाजात दाखवला असला तरी तो झाला नाही. कोल्हापूरच्या खंडपीठाच्या मागणीला छेद देणारी माझी भूमिका नाही. त्यामुळे कृपया माझ्या भूमिकेबाबतीत गैरसमज निर्माण करू नये, अशी भूमिका काँग्रेसचे नेते व पलूस-कडेगाव आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी स्पष्ट केली.डॉ. विश्वजित कदम म्हणाले, पुणे हा उल्लेख अनावधानाने झाला असून, सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देऊन मी त्याबद्दलचे स्पष्टीकरण देणार आहे. कोल्हापूरला खंडपीठ व्हावे, ही पश्चिम महाराष्ट्राची जनभावना आहे. आपण त्या जनभावनेसोबतच आहोत. कोल्हापुरात खंडपीठ झाले तर ते सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्यासाठी उपयुक्त होणार आहे. सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध शिष्टमंडळांना मी व्यक्तिशः देखील याबाबतीत भेटीदरम्यान आश्वासन दिले आहे. त्यामुळे कोल्हापूर खंडपीठाला माझा विरोध नाही आणि याप्रश्नी महाराष्ट्र शासनाकडे ही भूमिका मी पुढाकाराने मांडण्यास मागे राहणार नाही. खंडपीठाच्या बाबतीतील प्रामाणिक भूमिकेतून मी अशासकीय ठराव आणला होता. मात्र, अनावधानाने त्यात चुकीचा उल्लेख आहे. या विषयावर सभागृहात कामकाज झालेले नाही. कोल्हापूर खंडपीठ प्रयत्नांना खीळ बसू नये, म्हणून आपण सोमवारीच तसे पत्र अध्यक्ष नार्वेकर यांना देणार आहे. या चळवळीत कार्यरत वकील, पक्षकारांनी लक्ष विचलित न होऊ देता आपले प्रयत्न सुरू ठेवावे. त्यांच्या प्रयत्नांना यश यावे, म्हणून मी निःसंकोचपणाने पार पाडण्यात मी मागे राहणार नाही. माझ्या भूमिकेत कोल्हापूर मागणीला छेद देण्याचा हेतू नव्हता आणि हा विषय प्रलंबित राहावा, अशी आपली भूमिका कधीही नव्हती.मुख्यमंत्र्यांची भेट घेणारनजीकच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही कोल्हापूर खंडपीठ स्थापन करावे, त्यासाठी प्रयत्न करणार आहे. खंडपीसाठीच्या सर्व सुविधा कोल्हापुरात आहेत. मुंबईत जाण्याचा आणि राहणे, खाण्यापर्यंतच्या खर्चाची पक्षकारांची बचत होणार आहे. ही बाब या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन यावर निर्णयासाठी सक्रिय सहभागी राहीन. कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे डॉ. विश्वजित कदम म्हणाले.
कोल्हापूर खंडपीठ प्रश्नावरुन आमदार विश्वजित कदमांचा यु-टर्न, म्हणाले..
By अशोक डोंबाळे | Published: July 06, 2024 6:18 PM