'मी केवळ पतंगराव कदम साहेबांमुळेच शिकलो'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 10:22 AM2018-03-10T10:22:02+5:302018-03-10T17:59:29+5:30
पतंगराव कदम यांच्या सारखा माणूस पुन्हा होऊ शकणार नाही, अशी भावना भारती विद्यापीठातील विद्यार्थी संकेत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
पुणे : पतंगराव कदम यांच्या सारखा माणूस पुन्हा होऊ शकणार नाही, अशी भावना भारती विद्यापीठातील विद्यार्थी संकेत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ''माझं संपूर्ण शिक्षण साहेबांनी मोफत केलं. मी पाचवीपासून भारती विद्यापीठाच्या शाळेत शिक्षण घेतलं. माझं एम एस सी पर्यंतच शिक्षण साहेबांनी मोफत केलं'', पतंगरावांनी केलेल्या कार्याची आठवण सांगताना संकेत शिंदेला गहिवरुन आले होते. पतंगराव कदमांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यानं रात्रीच एसटीनं पुणे गाठले.
मूळचा सांगलीतील रहिवासी असेलल्या संकेतची घरची परिस्थिती तशी बेताची होती. पतंगराव कदम यांच्या मदतीमुळे शिक्षण घेऊ शकलो, असं संकेतनं सांगितलं. पुढे तो असंही म्हणाला की, पतंगराव कदम यांना माझी अडचण सांगताच त्यांनी माझे शिक्षण मोफत केले. माझेच नाहीतर माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मदत केली. सांगलीतच नाहीतर राज्यातील गरीब कुटुंबातील मुलांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली. माझ्या एका नांदेडच्या मित्राची शैक्षणिक अडचण सांगता त्यांनी कशाचाही विचार न करता त्यालाही मदत केली. त्यांनी त्याच्या संपूर्ण आयुष्यात विद्यार्थ्यांना आणि खास करून गरीब विद्यार्थ्यांना खूप मदत केली. विद्यार्थी त्यांचे उपकार कधीही विसरू शकणार नाहीत''