सांगली : मागील लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे चिन्ह गायब केले. यंदाच्या निवडणुकीतही असेच षड्यंत्र रचण्यात आले. या षड्यंत्रात मी फसलो, अशी स्पष्ट कबुली देत ज्या लोकांनी सांगलीच्या जागेला दृष्ट लावली त्यांच्या राजकारणालाही लवकरच दृष्ट लावू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे दिला.
सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या आवारात काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले की, सांगलीच्या जागेसाठी खूप संघर्ष केला. सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये, म्हणून काहींनी षड्यंत्र रचले होते. मागच्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसकडून ही जागा काढून घेतली. मात्र, उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला नाही. यंदा जागा काढून घेताना उमेदवारीचा प्रश्नही निर्माण केला गेला. मी यात फसलो. तरीही चक्रव्यूहातून मी लवकरच बाहेर येईन. त्यानंतर ज्यांनी राजकारण केले, त्यांचा हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही.
सांगलीची जागा हातातून गेल्याचे दु:ख जेवढे सांगलीकरांना झाले, त्यापेक्षा ते अधिक प्रदेशाध्यक्ष म्हणून मला झाले आहे. तरीही देशातील लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडी म्हणून एकत्र राहणे आवश्यक आहे. ज्या गांधी परिवाराने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्यांना चौकशीला नेणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
विशाल, चंद्रहार यांचा नामोल्लेख टाळलासर्व प्रमुख नेत्यांनी भाषणात महाविकास आघाडी, मशाल यांच्या प्रचाराचे आवाहन केले. मात्र, चंद्रहार पाटील यांचा नामोल्लेख केला नाही. याशिवाय बंडखोरीवर चर्चा झाली. मात्र, विशाल पाटील यांचे नावही घेण्याचे नेत्यांनी टाळले.
सभेत गोंधळ अन् घोषणाबाजीसभा सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस आमच्या रक्तात, मग विश्वजितदादांचा मान का राखला नाय’ अशा आशयाचे फलक दाखवून घोषणाबाजी केली. दुसरीकडे एक कार्यकर्ता भाषण करण्यासाठी परवानगी मागत होता. त्याला रोखल्यानंतर त्याने घोषणा दिल्या. भाषण संपवून विश्वजित कदम यांनी व्यासपीठावरून खाली येऊन कार्यकर्त्याची समजूत काढली. सभा संपवून नेते व्यासपीठावरून खाली उतरत असताना विशाल पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ‘नो मशाल, ओन्ली विशाल’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे गोंधळ वाढला.