लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : केंद्र सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवून जो आसूड ओढत आहे, तो कदापीही सहन केला जाणार नाही. याबाबत जनआंदोलन छेडून केंद्र सरकारला याचा जाब विचारू, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध आणि महागाईविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला पाठिंबा म्हणून पलूस येथे काँग्रेसच्यावतीने उपोषण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील, खाशाबा दळवी, महिला अध्यक्ष श्वेता बिरणाळे, डॉ. मीनाक्षी सावंत, गिरीश गोंदिल, तालुक्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे केले आहेत. या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही. गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत, महागाई वाढली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. यासाठी जनआंदोलन छेडून सामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू.