सांगली : सांगली विधानसभेची पुढील निवडणूक भाजपच्यावतीने अन्य कोणी नव्हे तर मीच लढणार आहे, असे स्पष्टीकरण आ. सुधीर गाडगीळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. गाडगीळ पुढील निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याने त्यांच्याजागी अन्य कोणी निवडणूक लढवेल, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. विरोधी पक्षाचा आमदार असूनही गेल्या तीन वर्षांत ४२५ कोटींची कामे मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आमदार निधीतून २०१९ मध्ये २.८५ कोटी, २०२०-२१ मध्ये ३.६ कोटी तसेच २०२१-२२ मध्ये ४.१८ कोटी अशी एकूण ९.३६ कोटींची कामे झाली. निधीतून रस्ते डांबरीकरण व गटर बांधकाम, सामाजिक सभागृह तसेच पथदिव्यांची कामे करण्यात आली. माजी सैनिकांच्या मागणीनुसार त्रिकोणी बागेत शहीद स्मारक उभारण्यात आले. कोविड काळात सिव्हील हॉस्पिटल व महापालिका रुग्णालयास प्रत्येकी १७ लाखांची रुग्णवाहिका, सिव्हील हॉस्पिटलमध्ये ९० लाखांचा ऑक्सिजन प्लांट, ८.२२ कोटी सिटी स्कॅन यंत्र आदी कामे करण्यात आली.
मतदारसंघात तीन रेल्वे उड्डाणपूल मंजुरीची घोषणा नुकतीच नितीन गडकरी यांनी केली आहे. सांगली शासकीय रुग्णालयाच्या खुल्या जागेत शंभर बेडच्या रुग्णालय उभारणीसाठी ४५.४० कोटी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातून शंभर बेडच्या रुग्णालयासाठी ३२.४५ कोटी असे एकूण ७७.८५ कोटी मंजूर झाले आहेत. सिव्हील हॉस्पिटलच्या खुल्या जागेत मंजूर असलेले मिरज येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या नवजात शिशू रुग्णालय बांधकामास ४६.७४ कोटी मंजूर आहेत. शासकीय रुग्णालयात महालॅब (नि:शुल्क प्रयोगशाळा) सुरू करण्याची मागणी शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली असून, त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास गाडगीळ यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, सांगली विधानसभेची पुढील निवडणूक भाजपच्यावतीने अन्य कोणी नव्हे तर मीच लढणार आहे. याबाबतच्या चर्चा व्यर्थ आहेत.
यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, विनायक सिंहासने, प्रकाश बिरजे, मुन्ना कुरणे, नगरसेविका स्वाती शिंदे उपस्थित होते.
राज्य शासनाचे सहकार्य
विरोधी पक्षाचा आमदार असतानाही राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी चांगले सहकार्य केले. मला कोठेही अडचण आली नाही, असे गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.