मी जनतेतून लढूनच विधानसभेत जाणार, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांचा निर्धार
By अशोक डोंबाळे | Published: July 16, 2024 04:47 PM2024-07-16T16:47:13+5:302024-07-16T16:48:46+5:30
विधान परिषदेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला पूर्ण विराम दिला
सांगली : सांगलीविधानसभा निवडणूक मी जनतेतूनच लढवणार आहे. काँग्रेस नेत्यांना व प्रदेश पदाधिकाऱ्यांना तसे स्पष्टपणे सांगितले आहे. पक्षाकडे उमेदवारीही मागितली असल्याचे सांगत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला पूर्ण विराम दिला आहे. जयश्रीताई पाटील यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
चिंतामणीनगर येथील मदनभाऊ युवा मंचतर्फे वृक्षारोपणानंतर जयश्रीताई पाटील बोलत होत्या. काँग्रेस नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाची सुरुवात चिंतामणीनगर येथे १०० झाडे लावून करण्यात आली. यावेळी सावली निवारा केंद्रातील बेघर उपस्थित होते.
जयश्रीताई पाटील यांनी जनतेच्या पाठिंब्यावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर यंदा सांगली विधानसभा निवडणूक मी जनतेतूनच लढविणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. सांगली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जयश्रीताई पाटील यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे इच्छुक आहेत. पृथ्वीराज पाटील यांनी मागील निवडणुकीत भाजपच्या विरोधात जोरदार लढत दिली होती. त्यांचा त्या निवडणुकीत निसटता पराभव झाला. गेल्या पाच वर्षांपासून ते पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष ..
आता निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. सांगली लोकसभेला विशाल पाटील व विधानसभेला पृथ्वीराज पाटील हे जवळपास ठरले होते. गेल्या वर्षभरापासून याची चर्चाही होती. जाहीर कार्यक्रमातून पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवाराबाबत काँग्रेस नेत्यांकडून संकेतही दिले जात होते. मात्र, आता सांगली विधानसभा निवडणूक लढण्याची भूमिका जयश्रीताई पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सांगली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.