Sangli Politics: मलाही मंत्री व्हायचंय, भविष्यात काँग्रेससोबत राहीन असे नाही; विशाल पाटलांच्या विधानाने खळबळ
By अशोक डोंबाळे | Updated: April 10, 2025 19:23 IST2025-04-10T19:23:10+5:302025-04-10T19:23:54+5:30
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला बळ

Sangli Politics: मलाही मंत्री व्हायचंय, भविष्यात काँग्रेससोबत राहीन असे नाही; विशाल पाटलांच्या विधानाने खळबळ
सांगली : येथील एका महाविद्यालयातील कार्यक्रमामध्ये सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी ‘आपल्यालापण मंत्रिपद मिळावं, भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन’, असं थेट वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. शिवाय ते कोणत्या पक्षात जाणार याचीही चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
सांगलीतील एका महाविद्यालयात गुरुवारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेही उपस्थित होते. विशाल पाटील म्हणाले, योगायोग आहे मीपण पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे. जयकुमार गोरे ही अपक्ष म्हणूनच आमदार झाले. पुढे ते मंत्रीही झाले. ते अपक्ष न राहाता ते भाजपमध्ये गेले आणि मंत्री झाले असे सुचक वक्तव्यही खासदार पाटील यांनी यावेळी केले. भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. शिवाय जसे जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळाले तसे मलादेखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्हीपण पुढे जावे, असं आपल्याला वाटत असावे, असेही विशाल पाटील म्हणाले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. खासदार विशाल पाटील मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. शिवाय काँग्रेसबरोबर नाही तर अन्य पक्षात जाईन या वक्तव्यानेही काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पाटील भाजपच्या वाटेवर आहेत का? याची चर्चा या निमित्ताने सांगलीत सुरू झाली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला बळ
भाजप नेते तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला होता. आमच्याकडे या विकासासाठी निधी आणि पद मिळेल असेही त्यांनी म्हटलं होतं. पण यावर आपण योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ, असे विशाल पाटील यांनी सांगत भाजप प्रवेशाच्या चर्चेतून अंग काढलं होतं. पण आता त्यांनी भाजप नेते गोरे यांना जसे मंत्रिपद मिळाले तसेच आपल्यालादेखील मंत्री व्हावे असं वाटतं, असे वक्तव्य केले. हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याच्या प्रस्तावाला बळ देणारे आहे, अशी चर्चा रंगली आहे.