बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील डाॅ. आर. आर. पाटील हे बोरगाव व परिसरातील गावागावांत कोरोनात गरजू रुग्णांची मोफत सेवा करीत आहेत. आज या सेवाभावी वृत्तीमुळे ते घराघरांत पोहोचले आहेत. त्यांची जन्मभूमी इस्लामपूर असली तरी आता बोरगाव ही त्यांची कर्मभूमी बनली आहे.
ते नेहमी म्हणातात, ‘मला जे माझ्या जन्मगावाने दिले नाही ते बोरगावने दिले आहे’.
गेली ३२ वर्षे रुग्णसेवा करीत त्यांनी रुग्णांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. डाॅक्टरांचे शिक्षण जरी बी. एच. एम. एस. असले तरी त्यांनी भल्याभल्या एम.डी. एम.एस. डॉक्टरांना आपल्या अनुभवाने मागे टाकले आहे.
डाॅ. आर. आर. पाटील यांनी कधीच पैशाला महत्त्व दिले नाही; तर ‘जनसेवा व रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ मानत नेहमी रुग्णांची सेवा केली.
आज ही डाॅक्टर धनाने मोठे नाहीत; तर ते सदैव मनाने मोठे आहेत. हे नेहमी गावाने अनुभवले आहे. २००५ व २०१९ चा महापूर असो की सध्याच्या कोरोना काळात धन्वंतरीरूपी अवलियाने संपूर्ण परिसराला नेहमीच मदत केली व तीही मोफत. महापुरातही त्यांनी उपचार असो अथवा सल्ला देण्याचे काम घरात जाऊन मोफत केले.
चाैकट
गरजूंसाठी सेवा
नागरिकांनी घाबरून न जाता कधी रात्री-अपरात्री मला फोन करा. शक्य तितकी मोफत मदत करण्यास मी सदैव तत्पर आहे. घरी उपचार घेत असाल तर मी तुमच्या सेवेसाठी असेन. हेच डाॅक्टरांचे शब्द परिसरातील रुग्णांना दिलासा देत आहेत. कोरोनाच्या काळात आपली माणसं फाऊंडेशनच्या माध्यमातून गरिबांना घरोघरी मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूही डाॅक्टरांनी दिल्या आहेत.