पलूस : ‘आदर्श’ म्हणून राज्याने गौरविलेला पलूस तालुका आता भ्रष्टाचारात आदर्श म्हणून नावाजला जाणार यात शंका नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खुदाईतील कथित भ्रष्टाचारामुळे पलूस तालुका भ्रष्टाचाराने चांगलाच पोखरला गेला असल्याचे वास्तव समोर आले आहे.निर्मलग्राम योजना, डिजिटल तालुका, तंटामुक्त अभियान १०० टक्के राबविणे, इको व्हिलेज तालुका, तसेच स्वच्छता अभियानात पलूस तालुक्याने शासनाची पारितोषिके मिळवली आहेत. सधन व समृद्ध पलूस तालुका दरडोई उत्पन्नात राज्यात अग्रेसर आहे. अशा या पलूस तालुक्यात भ्रष्टाचार हा प्रकार नव्हता. परंतु अलीकडे मात्र पलूस तालुक्यात भ्रष्टाचाराने चांगलेच डोके वर काढले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २८४ लाभार्थींनी अनुदान मिळवले आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तालुक्यातीलच जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केल्याने, तालुक्यात खळबळ उडाली आहे.२८४ लाभार्थींनी कोणत्या गट नंबरमध्ये विहीर काढली आहे, प्रकरणाला कधी मंजुरी मिळाली, विहिरीचे काम कधी पूर्ण झाले आदी माहिती घेण्यासाठी शाखा अभियंत्यांची ५ पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरच यातील भ्रष्टाचाऱ्यांचे चेहरे उघड होतील. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे या भ्रष्टाचाराची कशाप्रकारे दखल घेतात, याची चर्चा सुरू आहे. परंतु या शासकीय योजनेत मोठी अनियमितता झाल्याने पलूस तालुक्याचे नाव मात्र डागाळले आहे. काही दिवसांपूर्वी पलूस पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदकुमार विठोबा चव्हाण आणि लिपिक वैजयंती पाटोळे यांना, लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. पलूस तालुक्याचे नाव भ्रष्टाचारामध्ये पुढे येऊ लागले आहे. (वार्ताहर)आरोपाने खळबळ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २८४ लाभार्थींनी अनुदान मिळवले आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तालुक्यातीलच जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केल्याने, तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आदर्श पलूस तालुक्याला लागले भ्रष्टाचाराचे ग्रहण
By admin | Published: June 23, 2015 12:04 AM