अंजर अथणीकर - सांगली -सामाजिक सलोख्याच्या अनोख्या पायावर सांगलीच्या ईदगाह मैदानावर सुंदर इमारत उभारली जात आहे. मुस्लिम समाजाशिवाय अन्य धर्मीयांनीच मदतीचा मोठा हात देत या सुंदर इमारतीला समतेचा रंग दिला असून, आपले देखणे रूप घेऊन ही इमारत आता ईदच्या सणासाठी सज्ज झाली आहे. चंद्रदर्शनानंतर रमजान ईदची नमाज येथील ईदगाह मैदानावर अदा केली जाणार आहे. ईदगाह मैदानाचे बांधकाम आता पूर्णत्वाकडे आले आहे. एकूण सव्वा कोटीचा हा प्रकल्प असताना, आता यावर १ कोटी १० लाख रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे ईदगाहच्या बांधकामासाठी सर्वधर्मीय मदत लाभली असून, भविष्यात ईदगाह मैदान सर्व धर्मीयांचे प्रतीक ठरणार आहे.येथील जुना बुधगाव रस्त्यावर गेल्या चार वर्षांपासून ईदगाह मैदानाचे बांधकाम सुरू आहे. अरेबिक पध्दतीच्या कमानी यासाठी उभारण्यात आल्या आहेत. मुस्लिमांच्या आवाहनाला इतर धर्मीयांनीही साथ देऊन याच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत केली आहे. यामुळे याचे बांधकाम गतीने होण्यास मदत झाली आहे. या मैदानामध्ये एकाचवेळी ४० हजार मुस्लिम बांधव ईदची नमाज अदा करूशकणार आहेत. चारही बाजूने हे मैदान कुंपणाने बंदिस्त करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, सुमारे पंधरा लाखांचे काम शिल्लक आहे. आता रमजान ईदनंतर उर्वरित काम सुरू करण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी साफसफाई सुरू आहे. ईदच्या खरेदीमुळे कापड पेठ, सराफ कट्टा, दत्त मारुती रस्ता, हरभट रस्ता आदी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सुका मेवा, सौंदर्यप्रसाधने, मेहंदी, कपडे आदींच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. चंद्रदर्शनानंतर ईद रमजान ईदची नमाज चंद्र दिसताच त्याच्या दुसऱ्यादिवशी जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता अदा केली जाणार आहे. मुस्लिम बांधवांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन ईदगाह समितीचे अध्यक्ष हारुण शिकलगार व सचिव मुन्ना कुरणे यांनी केले आहे.
सर्वधर्मीयांच्या मदतीने साकारले ईदगाह मैदान
By admin | Published: July 16, 2015 11:20 PM