सांगली : घरगुती व सार्वजनिक गणेश मुर्तीचे नदीपात्रात विसर्जन न करता त्या दान करा, या महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गतवर्षीपेक्षा यंदा महापालिकेकडे मुर्तीदान करणाऱ्यांसाठी नागरिकांचा ओढा अधिक होता. गणेशोत्सवाच्या काळात १७८६ मुर्तीचे दान करण्यात आले. तर कृत्रिम कुंड, तलावात १८ हजार मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी झटणाऱ्या या चळवळीला मोठे बळही मिळाले आहे.सांगलीत लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी शहरातील नदी, तलाव येथे उत्साहाला भरते आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणूकाही निघाल्या. गणपती बाप्पा मोरयाचा अखंड गजर मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला होता. त्यातच कृष्णा नदी पात्रात पाण्याची पातळी खालावल्याने गणेश मुर्तीच्या विसर्जनात विघ्न येणार का काय? अशी स्थिती होती. पाचव्या दिवसापर्यंत नदीपात्र कोरडे होते.महापालिकेने ३५ हून अधिक ठिकाणी कृत्रिम कुंड, तलाव उभारले होते. तसेच नदीकाठासह शहरातील विविध भागात मुर्तीदान केंद्रही सुरू केले होते. प्रशासनाची योग्य व्यवस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांकडून केलेले आवाहन यामुळे भाविकांमधून मुर्तीदान व कुंडात विसर्जनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक १२०० मुर्तीचे दान सांगली शहरात झाले तर कुंडात ७ हजार मुर्तीचे विसर्जन करून कुपवाडकर आघाडीवर आहेत. दहा दिवसांत १८ हजार मुर्तीचे कृत्रित कुंडात विसर्जन झाले. तर १७८६ मुर्ती दान देण्यात आल्या. या काळात महापालिकेने १४७ टन निर्माल्य संकलन केले.
सांगलीत मुर्तीदान उपक्रम ठरतेय चळवळ; महापालिकेकडे १८०० मुर्ती दान, कुंडात १८ हजार मुर्तीचे विसर्जन
By शीतल पाटील | Published: September 29, 2023 5:25 PM