विट्याचे सुपुत्र, माजी आ., लोकनेते हणमंतराव पाटील यांनी शहराच्या विकासाला चालना देऊन सर्वसामान्य नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले. त्यांचाच वारसा जपत माजी आ. अॅड. सदाशिवरावभाऊ पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघाला विकासाची एक नवी दिशा दिली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत माजी नगराध्यक्ष अॅड. वैभवदादांनी नगरपालिकेच्या माध्यमातून युवा संघटन मजबूत करीत स्वच्छतेत सुवर्णनगरी विटा शहराचा देशात नावलौकिक केला.
सध्या वेगाने वाढत असलेले विटा शहर देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी स्वच्छता अभियानाचे ब्रॅन्ड ॲम्बेसिडर म्हणून काम करीत असलेले वैभवदादा अत्यंत नियोजनबध्द काम करीत आहेत. माजी आ. सदाशिवरावभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील तसेच पदाधिकारी, नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने विटा शहराच्या स्वच्छतेचा रथ सध्या वेगाने धावू लागला आहे.
विटेकर नागरिकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात असल्याने माजी नगराध्यक्ष वैभवदादांना स्वच्छ भारत अभियानात शहराला देशात अव्वल आणण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.
विटा शहराचा नियोजनबध्द विकास आणि नागरिकांना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी वैभवदादांनी आजही प्राधान्य दिले आहे. आदर्श शैक्षणिक संकुल, विटा अर्बन बॅँकिंग ग्रुप, विराज शुगर यासह अन्य संस्थांचा कारभार यशस्वीरित्या सांभाळत त्यांचे राजकारणातून समाजकारण सुरू आहे. विटा शहरच नव्हे, तर संपूर्ण खानापूर मतदारसंघात सामाजिक, सहकार, शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांती व्हावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. लोकनेते हणमंतराव पाटील यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून विटा शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर त्यांची तिसरी पिढी आज नगरपालिकेच्या सभागृहात प्रतिनिधीत्व करीत आहे.
माजी आ. सदाशिवरावभाऊंनी तर सलग १० वर्षे विधानसभेत खानापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन आज माजी नगराध्यक्ष वैभवदादा काम करीत आहेत. विटा नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास साधत असताना त्यांनी विटा शहराची ‘स्वच्छ व सुंदर विटा’ अशी देशात ओळख करून दिली. स्वच्छतेत सातत्य आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मिळत असलेला लोकसहभाग यामुळे शहर स्वच्छतेत देशात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी सज्ज झाले आहे. विटेकर नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य यासह अन्य सुविधा देण्यासाठी वैभवदादांनी प्राधान्य दिले आहे.
विटा शहरातून संकलित होणाऱ्या सुका व ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून पेव्हिंग ब्लॉक, वीज निर्मितीची संकल्पना त्यांनी सत्यात उतरविली आहे. कचरा विलगीकरण व प्रक्रिया प्रकल्प आज देशात अव्वलस्थानी आला आहे. हा विटा पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरल्यामुळे वैभवदादांची संकल्पना यशस्वी झाली आहे. आता शहरात कोट्यवधी रुपयांचा भुयारी गटर योजनेचा प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येत आहे.
तसेच नवीन घोगाव पाणी योजनेचे विस्तारित कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे वैभवदादांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विटा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आणि मोठा टप्पा पूर्ण होणार आहे.
विटा शहराच्या विकासाचे स्वप्न पाहून ज्यांनी ते प्रत्यक्ष सत्यात उतरविले, ते लोकनेते हणमंतराव पाटील व माजी आ. सदाशिवरावभाऊ पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी विकासाची ज्योत कायम तेवत ठेवली आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड लागते. ते राजकारण करीत असताना कितीही वादळे किंवा अपयश आले, तरी वैभवदादा कधीही खचून गेले नाहीत.
त्यांनी आपली जनसेवा आणि विकासाची कास कधी सोडली नाही. खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमध्ये काम करीत असताना वैभवदादांनी आपले युवा संघटन मजबूत केले. त्यांचे बंधू माजी नगरसेवक विशालकाका पाटील यांनीही वैभवदादांच्या मार्गदर्शनाखाली युवक संघटनाला प्राधान्य दिले आहे.
दूध संघ, खरेदी-विक्री संघ, विराज केन शुगर कारखान्याच्या माध्यमातून माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवदादांनी शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघात युवक कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभा करून वैभवदादांनी युवकांना नवी दिशा दिली आहे. संपूर्ण मतदारसंघात वैभवदादांचे युवा कार्यकर्ते त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन जनसेवेला प्राधान्य देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून विटा शहराच्या विकासाचा महारथ वेगाने पुढे नेण्याचे काम युवा आयडॉल म्हणून परिचित असलेले माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील करीत आहेत. त्यांच्या या कार्याला ताकद मिळावी, हीच त्यांच्या वाढदिनी सदिच्छा..!
- दिलीप मोहिते, विटा.
फोटो - ०५१२२०२०-विटा-वैभव पाटील, विटा.