ग्रामीण भागातून येत स्पर्धा परीक्षेचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरवणारे व त्यानंतरही आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वाने अनेक तरुणांमध्ये स्फूर्ती जागवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विश्वास नांगरे-पाटील. स्वप्नं बघावीत आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिद्द, चिकाटी ठेवत मेहनत करावी, हा मूलमंत्र त्यांनी राबवला. म्हणून आजही राज्यातील तरुणांचे ते आदर्श बनले आहेत.
शिराळा तालुक्यातील कोकरूड हे नांगरे-पाटील यांचे गाव. प्रशासकीय सेवेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना १९९७ मध्ये एकाचवेळी सलग १३ स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी यश मिळवले. छोट्याशा गावातून येऊनही कोणताही न्यूनगंड न बाळगता केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. जिल्हा परिषदेच्याच शाळेत शिक्षण झालेल्या नांगरे पाटील यांच्या वडिलांना सुरुवातीला त्यांनी मल्ल व्हावे वाटत होते. मात्र, त्यांची शैक्षणिक प्रगती पाहिल्यानंतर त्यांनी लाल दिव्याच्या गाडीत मला बघायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली आणि विश्वास यांनीही वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी यशही मिळवून दाखवले. दहावीत ते तालुक्यात पहिले आले होते. बारावीपर्यंत स्पर्धा परीक्षेचा गंध नसताना त्यांचे यश तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी कोल्हापूरला बीएचे शिक्षण पूर्ण करत करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यानंतर कायद्याचीही पदवी घेतली.
मुंबईतील २६/११ हल्ला असो किंवा इतर कोणतीही घटना नांगरे पाटील यांनी निडरपणे त्याचा सामना केला. केवळ खाकी वर्दीतच न रमता त्यांनी लेखनालाही प्राधान्य देत ‘मन मे है विश्वास’ आणि ‘कर हर मैदान फतेह’ ही दोन पुस्तकेही लिहिली आहेत.