लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : लोकांमध्ये काम करण्याची मोठी ताकद आहे. मात्र, योग्य दिशा दाखवणारे नाहीत. समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माणसाची खरी गरज आहे. गावातील हेवेदावे, मतभेद विसरून एका विचाराने काम केल्यास गाव विकासापासून मागे राहणार नाही, असे प्रतिपादन पाटोदा (जि. औरंगाबाद) गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले.
कोकरूड (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत कोकरूड व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तामिळनाडू सरकारचे सचिव आनंद पाटील होते. युवानेते सत्यजीत देशमुख, फत्तेसिंगराव देशमुख जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, माजी सभापती बाळासाहेब पाटील, हणमंत पाटील, विकास नांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पेरे-पाटील म्हणाले की, सरपंच कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याने लोकांच्या गरजा ओळखून काम करणे गरजेचे आहे. समाजात खूप काही चांगले करण्यासारखे आहे. मात्र, ते झाकले गेले असल्याने ते होत नाही. लोकांमध्ये चुकीची माहिती जास्त प्रमाणात पसरत असल्याने मोठे नुकसान होत आहे.
मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या दोन महिन्याच्या पगारामधून कोकरूड येथील दहा व्यक्तींना आबा फाउंडेशनच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपयांची आपत्कालीन वैद्यकीय मदत दिली. नंदकुमार पाटील यांनी स्वागत केले. पाहुण्याचा परिचय बाबासाहेब परीट यांनी करून दिला. संजय घोडे यांनी सूत्रसंचालन केले, तर मोहन पाटील यांनी आभार मानले. यावेळी विकास नांगरे, सरपंच विलास वाघमारे, उपसरपंच पोपट पाटील, सुजीत देशमुख, गजानन पाटील आदी उपस्थित होते.
चाैकट
सर्वांना सोबत घ्या
आपला गाव, समाज, देश पुढे घेऊन जायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला. मार्ग अपोआप सापडेल. सध्या सुरू असलेली शिक्षण पद्धत चुकीची असून मुलांना त्यांच्या चुका आणि त्यावर उपाय शिकवले तर पुढची पिढी यशस्वी होईल.
फोटो-१५कोकरूड१ व २