इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांची मानसिक व आर्थिक हानी होत आहे. अनेक रुग्णालयातील ढिसाळ कार्यपद्धतीमुळे रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. बहुतांश खासगी हॉस्पिटल अनामत रक्कम भरल्याशिवाय उपचार करीत नाहीत. रुग्णांची अडवणूक झाल्यास संबंधित हॉस्पिटलसमोर ठिय्या मारून जाब विचारला जाईल. असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष व नगरसेवक शहाजी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे लोकांची रोजीरोटी थांबल्याने त्यांना उपचार परवडत नाहीत. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट गंभीर वळण घेत आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचे संकट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार थांबले. अनेक तरुणांना नोकरी गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. सध्या एक-एका कुटुंबात अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे या कुटुंबात मोठा आर्थिक खड्डा पडून कर्जबाजारीपणा वाढत आहे. अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष व तरुण यांना प्राण गमवावा लागत असल्याने अडचणी वाढत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे तळ ठोकून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करीत आहेत. प्रशासनात समन्वय साधत आहेत. पण या कोरोनाच्या महामारीत काही खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची पैशासाठी अडवणूक केली जात आहे. मोठमोठ्या अनामत रकमा भरून बेड दिले जात आहेत. त्यामुळे सामान्य व मध्यमवर्गीय रुग्णांचे हाल होत आहेत. जयंत पाटील यांनी अनामत रक्कम घेणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कोरोना रुग्णसेवेसाठी तत्पर असून अडवणूक झाल्यास संपर्क साधावा.