सांगली : शहरात घर भाड्याने घ्यायचे आणि काळे धंदे करायचे, असे प्रकार वाढीस लागले आहे. त्यामुळे कोणालाही घर भाड्याने दिले अथवा पोटभाडेकरू ठेवला तर त्याची नोंद पोलिसांत करणे आवश्यक आहे. त्यामुळे गुन्ह्याची उकल होण्यास मदत होते.
शहरात अनेक घरमालकांनी घरे भाडेतत्वावर दिली आहेत. हा भाडेकरू कोण आहे, तो काय काम करतो, त्याचे गाव कोणते, त्याचा पूर्वतिहास काय याची कसलीच माहिती घरमालकाला नसते. कोणाच्या तरी ओळखीने तो भाडेकरू ठेवतो. या भाडेकरूने एखादा गुन्हा केल्यानंतर मात्र घरमालकाचे धाबे दणाणते. पोलीस प्रशासनाकडून वारंवार भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन केले जाते. पण घरमालकांकडून निष्काळजीपणा केला जातो. अजूनही भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्यात स्वारस्य दाखविले जात नाही.
भाडेकरू म्हणून आले अन् गुन्ह्यात अडकले
- कुपवाड परिसरात काही परप्रांतीय तरुण कामाच्या निमित्ताने आले. एक खोली त्यांनी भाड्यानी घेतली. औद्योगिक वसाहतीत ते कामाला होते. त्यांची फारशी माहिती घरमालकाला नव्हती. त्यापैकी एकजण गावठी कट्टा विकताना पोलिसांना मिळून आला होता.
- परराज्यातून अथवा परजिल्ह्यातून अनेक संशयित गुन्हेगार शहरात आश्रयाला येत असतात. त्यासाठी ते भाड्याने घर घेतात. अशा गुन्हेगारांची पार्श्वभूमी घरमालकाला माहीत नसते. त्यामुळे भविष्यात घरमालकच अडचणीत येतो.
नोंद कशी करायची?
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये भाडेकरूकडून भरून घ्यावयाचा अर्ज असतो. अर्जात घरमालक व भाडेकरू यांची माहिती भरावी लागते. अर्जावर दोघांचा फोटो असतो. घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये झालेल्या कराराच्या प्रतीची झेरॉक्स तसेच दोघांचे ओळखपत्र या अर्जासमवेत जोडणे अनिवार्य आहे.
पोलिसांकडे भाडेकरूंची नोंद करा
- घरमालकाने खोली, घर भाड्याने देताना भाडेकरूकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आदी ओळखपत्रे घ्यावीत. त्याच्या झेराॅक्स प्रतींसह जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदणी करावी.
महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या
६,५०,००,०००
महापालिका क्षेत्रातील पोलीस ठाणे
९
पोलिस ठाण्यात भाडेकरूंची नोंद बंधनकारक आहे. भाडेकरूने एखादा गंभीर गुन्हा केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यास नोंदीमुळे मदत होणार आहे. त्यामुळे घरमालकांनी आपल्याकडील भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला द्यावी. -कल्लाप्पा पुजारी, निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे